रेणापूर : प्रतिनिधी
रेणापूर तालुक्यात ३७ हजार २५८ शेतक-यांसाठी ३६ कोटी ५९ लाख ५० हजार २१७ रुपये अनुदान प्राप्त झाले आहे. अनुदाना पैकी ३३ हजार ७३९ शेतक-यांंच्या खात्यावर ३३ कोटी १२ लाख ६९ हजार ८३५ जमा करण्यात आले आहे. ज्या शेतक-यांनी ईकेवायसी केली नाही, त्यांनी तात्काळ केवायसी करून घ्यावी, असे आवाहन उपविभागीय अधिकारी अविनाश कोरडे, तहसिलदार मंजुषा भगत व नायब तहसिलदार श्रावण उगले यांनी केले आहे .
गत वर्षी अत्यल्प आणि खंडित स्वरूपाचा पाऊस पडल्याने खरीप हंगामातील पिके जवळपास वाया गेली होती. त्यामुळे राज्य सरकारने राज्यातील ४० तालुके दुष्काळे म्हणून जाहरी केले होते. लातूर जिल्ह्यात केवळ रेणापूर तालुक्याचा समावेश होता. शासनाने दुष्काळी तालुक्यांसाठी मंजूर केलेले अनुदान त्या-त्या तालुक्याला प्राप्त झाले आहे. जिरायती शेतक-यांंना ८ हजार ५०० रुपये प्रती हेक्टर, बागायतीसाठी १७ हजार, तर फळबागेसाठी २२५०० इतके अनुदान देण्यात देण्यात आले आहे. खरीप हंगाम २०२३ च्या दुष्काळासाठी वाढीव क्षेत्राच्या निर्णयानुसार ३ हेक्टरपर्यंत आर्थिक मदत मिळणार आहे. मात्र यावरील पिकाचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान होणे आवश्यक आहे.