23.3 C
Latur
Sunday, July 14, 2024
Homeलातूरशेतजमीनीची माती, कोवळी पिके गेली वाहून

शेतजमीनीची माती, कोवळी पिके गेली वाहून

शिरुर अनंतपाळ : प्रतिनिधी
शिरूर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ, राणी अंकुलगा, बाकली व बिबराळ परीसरात रविवारी दुपारी पावसाने अक्षरश: झोडपून काढले. या ढगफुटीसदृश पावसात  शेतजमीन खरडून वाहून गेली तर कोवळ्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले. नाले ओढ्यांना पूर आल्याने  शेतक-यांंना फटका बसला आहे. या पावसाने शेतक-यांवर अस्मानी संकट कोसळले असून शेतकरी अस्मानी संकटात सापडला आहे.
    या मुसळधार पावसामुळे राणी अंकुलगा येथील पर्यायी पूल वाहून गेला. शिवारातील नाल्यांना पूर आल्याने वाहनधारकांना ताटकळत बसावे लागले. तर काहींच्या शेतात पावसाचे पाणी साचले असून काहींची शेती पिकांसह खरडून गेली आहेत. महसुलकडून तलाठी गणेश राठोड यांनी पाहणी केली आहे तरी महसूल व कृषी विभागाने तातडीने या नुकसानग्रस्त शेतजमीनीचे पंचनामे करून शासनाकडून योग्य नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी शेतक-यांतून केली जात आहे. दरम्यान तालुक्यात पेरणी योग्य पाऊस झाल्याने पेरणीला चांगलाच वेग आला आहे तर काही शिवारात कोवळी पिके उगवली आहेत मात्र अशात रविवारी पाऊस झोडपल्याने  शेतक-यांवर संकट ओढावले असून या पावसाने शेतजमीन खरडून गेली तर पिकांसह जमीन वाहून गेल्याने शेतकरी हताश झाले आहेत.
शेतात पाणी साचल्याने दुबार पेरणीचे संकट आले आहे तर साकोळ शिवारात शेतजमीन वाहून गेली आहे तसेच यंदा गाळ टाकलेली नदी काठची जमीनीवरील सर्व माती वाहून गेल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. पूर परिस्थिती, दुबार पेरणीचे संकट सहन करीत यंदा अडचणीतून शेतकरी उभा राहत खरीप पेरणीची जुळवाजुळव केली मात्र रविवारच्या मुसळधार पावसाने शेतक-याच्या स्वप्नावर विरजन पडले आहे. प्रशासनाकडून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी नुकसानगृस्त शेतक-यांतून केली जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR