लातूर : प्रतिनिधी
शाळेची पहिली घंटा वाजण्यापूर्वी साहित्य खरेदीकडे पालकांचा कल दिसून येत आहे. शाळा आजपासून सुरु होत असल्याने रविवार विद्यार्थी व पालकांनी लातूरच्या बाजारपेठेत मोठी गर्दी केली आहे. बाजारात शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी विद्यार्थी व पालकांची एकच लगबग सुरु झाली आहे.
लातूर जिल्ह्यातील शाळा आज दि. १६ जून रोजी उघडणार असल्याने शहरातील बाजारपेठा आणि शैक्षणिक साहित्यांच्या दुकानांमध्ये पालकांची गर्दी पाहायला मिळत आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपत असल्याने बाजारात खरेदीसाठी गर्दी वाढली आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या पेन्सिल्स, कंपास बॉक्स, आकर्षक पेन्स, पाण्याच्या बाटल्या, स्कूल बॅग्ज आदी साहित्याने दुकाने सजली आहेत. शैक्षणिक साहित्याचे दर वाढले असल्याने पालकांच्या खिशाला यंदा कात्री लागली आहे. शाळा सुरु होण्यापूर्वी गणवेश, नवे बूट, दफ्तर, वह्या, पुस्तके, कंपास, पाऊच या शालेय साहित्याची खरेदी करण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांची विविध बाजारानंसह ड्रेसेस, फुटवेअर व स्टेशनंरीच्या दुकानांमध्ये गर्दी वाढू लागली आहे.
यंदाही बाजारापेठांमध्ये विद्यार्थ्यांना आकर्षित करणा-या वह्या उपलब्ध आहेत. मुलांच्या आवडीनुसार कार्टून, विविध गाड्या, खेळाडू, निसर्ग आदी चित्रे वह्यांवर दिसत आहेत. विविध रंगांच्या कार्टूनची चित्रे असणा-या विविध आकारांच्या स्कूल बॅग्ज बाजारात आल्या आहेत. शिवाय बार्बी डॉल्स, स्पायडर मॅन यांची चित्रे असलेल्या बॅग्ज तसेच टिफिन बॉक्सही विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. मात्र, किंमती जास्त असल्याने अनेक दुकानात पालक मुलांच्या हट्टाला आवर घालताना दिसून आलेय. खोडरबर, पेन्सिल पेन्स, रंगपेटी या साहित्याचा एकत्रित संच देखील बाजारात उपलब्ध आहे. हा संच घेण्याकडे कल वाढला असल्याचे दुकानदारांकडून सांगण्यात आले. याशिवाय सर्वत्र स्टीलच्या बाटल्या, स्टीलच्या फॅन्सी टिफिनला मागणी वाढली आहे.