20.5 C
Latur
Monday, December 23, 2024
Homeमहाराष्ट्रसंतोष देशमुख हत्या प्रकरणात उद्धवसेना न्यायालयात धाव घेणार!

संतोष देशमुख हत्या प्रकरणात उद्धवसेना न्यायालयात धाव घेणार!

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र आणि देशात चर्चा होत असलेल्या बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन तेरा दिवस उलटले आहेत. या घटनेने संपूर्ण राज्य हादरून गेलेले असताना अजूनही सातपैकी मुख्य तीन आरोपी फरार आहेत. महायुती सरकारमधील राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांचा राईटहँड म्हणून ओळखला जाणारा वाल्मीक कराड व इतर दोन आरोपी अद्यापही पोलिसांना सापडत नाहीत.

गृह खात्याच्या निष्काळजीपणामुळे दोषी आरोपी मोकाट फिरत असतील तर याविरुद्ध आम्ही दाद मागण्यासाठी मुंबई उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करणार आहोत, असे शिवसेना नेते विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली. आपल्या फेसबुक पेजवरून दानवे यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाबद्दल नाराजी व्यक्त करत एक पोस्ट व्हायरल केली आहे.

यात त्यांनी १३ दिवस उलटले तरी सरपंच संतोष देशमुख यांचे हत्यारे मुख्य आरोपी वाल्मीक कराडसह इतर आरोपी फरार आहेत. आरोपी मोकाट फिरत असतील तर याविरुद्ध आम्ही दाद मागण्यासाठी मा. मुंबई उच्च न्यायालय, संभाजीनगर खंडपीठात फौजदारी स्वरूपाची याचिका दाखल करणार आहोत असे म्हटले आहे.

आरोपी एवढे दिवस फरार असल्याने ते पुरावे सहज नष्ट करतील यात शंका नाही. आणि उद्या कारवाई झाली जरी तर पुराव्याअभावी ते दुस-या दिवशी बाहेर असतील, असा धोका अंबादास दानवे यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात संतोष देशमुख खून प्रकरणात विधिमंडळात सर्वप्रथम अंबादास दानवे यांनी वाल्मीक कराड याच्या नावाचा उल्लेख केला होता. एवढेच नाही तर त्याचा राष्ट्रवादीच्या एका मंत्याशी संबंध असल्याची चर्चा असल्याचे म्हटले होते.

त्यानंतर भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षासह सर्वांनीच वाल्मीक कराड याच्या दहशत आणि गुन्हेगारी कारवायांमधील सहभागाचा पाढा वाचला होता. पवन ऊर्जा कंपनीकडून दोन कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी फरार असलेला वाल्मीक कराड अधिवेशन काळात नागपूरमध्येच होता, तो कोणाच्या फार्महाऊसवर थांबलेला होता त्याचे नाव देखील मी सांगू शकतो, असे आव्हान अंबादास दानवे यांनी दिले होते. अद्याप वाल्मीक कराड व इतर मुख्य आरोपी फरार असल्याने अंबादास दानवे यांनी थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात फौजदारी स्वरूपाची याचिका दाखल करणार असल्याचे म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR