मानवत : भगवतप्राप्ती ही कितीही असाध्य असली तरी सत्संगाने ती साध्य होते. स्वत: मधील खलत्व व्यक्तीने मान्य केले पाहिजे. स्वत:मध्ये दुर्गुण आहेत हे मान्यच केले नाही तर त्याला दूर करणे शक्यच होणार नाही. स्वत:मधील दुर्गुण मान्य करण्याऐवजी ते अभिमानाने सांगितले जातात. अशाने जीवाचे कल्याण शक्यच नाही, असे प्रतिपादन ह.भ.प.चैतन्य महाराज देगलूरकर यांनी केले.
स्वामी दिव्यानंद सत्संग परिवाराच्या वतीने आयोजित पसायदान या विषयावर प्रवचनमालेत ते बोलत होते. पुढे बोलताना त्यांनी सांगितले, पसायदानामध्ये ज्ञानेश्वर माऊली दोन ओव्यामध्ये जे सहा मागणे मागतात त्यामध्ये सर्वात प्रथम खळांची व्यंकटी सांडो असे मागतात. म्हणजे जीवाने स्वत: मधील दुर्गुण लक्षात घेऊन ते दूर करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. घरातील कचरा बाहेर टाकणे आवश्यक आहे. त्यानंतर सत्कर्माचरणी रती वाढो म्हणजे सत्कर्म करून त्यामध्ये आवड निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
स्वत:मधील दुर्गुण कमी झाले सत्कर्म करण्यात आवड निर्माण झाली तर आणि हे करण्यासाठी सर्वांप्रती मैत्र भाव निर्माण व्हावा. दुरितांचे तिमिर जावे, प्रत्येकाला स्वधर्माचा सूर्य दिसावा आणि या भक्तिमार्गाचे जे सदाचरण करतात त्यांना जे पाहिजे ते मिळो असे ज्ञानेश्वर माऊली मागतात. परंतु समाज एकदम बदलत नाही. माऊलीनी जे मागणे मागितले आहे ते सहज साध्य नाही. याची जाणीव माऊलींनाही आहे. मग ते सहज साध्य करण्यासाठी सत्संग हा उपाय त्यांनी सांगितला आहे. सत्संगाने मानवी जीवाचे कल्याण होण्यासाठी आवश्यक सर्व साधन सोपे बनून जाते असे सांगितले.
यावेळी स्वामी शिवेंद्र चैतन्य महाराज, स्वामी ज्ञानचैतन्य महाराज, स्वामी राघवचैतन्य महाराज, ह.भ.प. उमेश महाराज दशरथे, ह.भ.प. रामराव महाराज हेंडगे, ह.भ.प. विनायक महाराज शिंदे मानोलीकर, ह.भ.प.पंडित महाराज डाके यांच्यासह वारकरी संप्रदायातील मान्यवर उपस्थित होते.