शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी
तालुक्यातील साकोळ जवळून जाणारा टेंभुर्णी-गुलबर्गा १४५ महामार्ग राज्य मार्ग शिरूर अनंतपाळ तळेगाव दे. तिपराळ, शेंद, कानेगावमार्गे जात आहे. हा रस्ता तळेगावपासून मधल्या मार्गे घेऊन न जाता तो हायवे रस्ता तळेगाव दे. येथून छत्रपती शिवाजी महाराज चौक साकोळ मार्गे तिपराळ, शेंद, कानेगाव मार्गे जावा या मागणीसाठी मंगळवारी सकाळी साकोळ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यात ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले.
साकोळचे सरपंच कमलाकर मादळे, उपसरपंच राजकुमार पाटील यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या रस्ता रोको आंदोलनात साकोळ परिसरातील हजारो ग्रामस्थ सहभागी झाले. तीन तासांच्या या आंदोलनामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या एक किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या. या प्रसंगी नायब तहसीलदार गवळी व तलाठी गणेश राठोड यांनी निवेदन स्वीकारले. शिरूर अनंतपाळ तालुक्यात साकोळ हे सर्वात मोठे गाव असून गावांत मोठी बाजार पेठ आहे. त्यामुळे या गावांतील व्यापारी अनेक ठिकाणाहून माल खरेदी व विक्री करण्यासाठी ये-जा करतात. त्यात सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रस्तावित असलेला टेंभुर्णी-गुलबर्गा महामार्गाच्या रस्त्याची पाहणी झाली असून हा रस्ता तळेगाव दे.शेंद मार्गे जाणार असल्याने त्यापासून साकोळ गाव वंचित राहणार आहे.
प्रस्तावित टेंभुर्णी गुलबर्गा १४५ हायवे रस्ता साकोळ मार्ग तिपराळ, कानेगाव मार्गे गेल्यास साकोळसह इतर गावांची दळणवळणाची सोय होणार आहे. राज्य महामार्ग १४५ हा साकोळ मार्गे नाही गेल्यास साकोळ परिसरातील गावातील नागरिकांना घेऊन तीव्र आंदोलन उभे करून राज्य महामार्गावरील काम बंद पाडणार असा इशारा उपसरपंच राजकुमार पाटील यांनी दिला आहे. या आंदोलनात विविध पक्षातील पदाधिकारी व ग्रामस्थांनी सहभाग नोंदविला.