पुणे : वृत्तसंस्था
मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा उसाचे क्षेत्र २ लाख हेक्टरने कमी झाले आहे. त्याचबरोबर साखर कारखान्यांसाठी परिपक्व उसाचा पुरवठा व्हावा आणि रिकव्हरी चांगली निघावी यासाठी मंत्री समितीच्या बैठकीत गाळप हंगाम सुरू करण्यासाठी १५ नोव्हेंबर ही तारीख एकमताने ठरवण्यात आली आहे. त्यामुळे यंदा मागील वर्षीच्या तुलनेत १५ दिवसांनी उशिरा साखर कारखाने सुरू होणार आहेत.
राज्यातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर परिसरातील ऊस मोठ्या प्रमाणावर कर्नाटक राज्यातील साखर कारखान्यांसाठी जातो. पण यंदा कर्नाटक राज्यातही साखर कारखाने १५ नोव्हेंबर रोजी सुरू होणार आहेत. त्यासंदर्भातील पत्र त्यांनी महाराष्ट्राला दिल्यामुळे आपण १५ नोव्हेंबर रोजी गाळप हंगाम सुरू करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आल्याची माहिती आहे. दिवाळीनंतर साखर कारखाने सुरू करावेत अशी मागणी ‘विस्मा’ने साखर आयुक्तालयाकडे केली होती.