34.9 C
Latur
Thursday, April 25, 2024
Homeलातूरसामाजिक सलोखा, शांतता कायम ठेवून जयंती, सण साजरे करा 

सामाजिक सलोखा, शांतता कायम ठेवून जयंती, सण साजरे करा 

लातूर : प्रतिनिधी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महात्मा ज्योतीराव फुले जयंती, श्रीराम नवमी आणि रमजान ईद आदी सण, जयंती उत्सव जिल्ह्यात साजरे होणार आहेत. सर्वधर्मीय बांधवांनी एकमेकांच्या भावनांचा आदर करीत हे जयंती, सण साजरे करावेत. या काळात सामाजिक सलोखा, शांतता कायम राखून लातूर जिल्ह्याची परंपरा जोपासावी, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महात्मा ज्योतीराव फुले जयंती, श्रीराम नवमी आणि रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित सर्व समाज प्रतिनिधी, जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी यांचा समावेश असलेल्या शांतता समितीच्या  बैठकीत श्रीमती ठाकूर-घुगे बोलत होत्या. पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, लातूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त्त बाबासाहेब  मनोहरे, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, अतिरिक्त्त पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्यासह भंते भिक्खु पय्यानंद थेरो, विविध समाज बांधव यावेळी उपस्थित होते.
लातूर जिल्ह्यात सर्व जाती-धर्मीय बांधव एकत्र येवून सण, उत्सव साजरे करतात, ही आजपर्यंतची परंपरा आहे. त्यामुळे आजपर्यंत जिल्ह्यातील सामाजिक सलोखा आणि शांतता टिकून असून हीच परंपरा कायम राखणे, ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आगामी काळात साजरे होणारे सण, जयंती उत्सव काळात सर्वांनी नियमांचे पालन करुन आणि एकमेकांच्या भावनांचा आदर करून उत्साही वातावरणात साजरे करावेत. यानिमित्ताने आयोजित मिरवणूक, शोभायात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नयेत, याबाबत दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी यावेळी केले.
सण, जयंती उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे. सर्वांनी कायद्याचे आणि आदर्श आचारसंहितेचे पालन करून सण, उत्सव साजरे करुन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी केले. तसेच जिल्ह्यात शांततामय वातावरणात सण, उत्सव साजरे व्हावेत, यासाठी पोलीस प्रशासनामार्फत उपाययोजना हाती घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
सण, जयंती उत्सव काळातील मिरवणुका, शोभा यात्रा यांना अडथळा होवू नये, यासाठी शहरातील रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. तसेच अडथळा होवू शकणा-या विद्युत वाहिन्या हटविण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली जाईल.  मिरवणूक, शोभा यात्रा मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठीही विविध उपाययोजना करण्यात येणार असल्याचे महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी सांगितले. प्रारंभी जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. बावकर यांनी प्रास्ताविक केले. तसेच पोलीस उपाधीक्षक फुंदे यांनी आभार मानले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR