लातूर : प्रतिनिधी
डिजिटल व्यवहारांचे प्रमाण झपाट्याने वाढत असताना सायबर फसवणूक व ऑनलाईन आर्थिक गुन्ह्यांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे. मोबाईल व इंटरनेटचा वापर वाढला असला तरी सायबर सुरक्षेबाबत पुरेशी माहिती नसल्यामुळे अनेक नागरिक आर्थिक फसवणुकीला बळी पडत आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये सायबर सुरक्षेविषयी जनजागृती निर्माण करून आर्थिक गुन्हे रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना विविध जनजागृती उपक्रम प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत.
त्याचाच एक भाग म्हणून दि. ७ जुलै रोजी गांधी चौक पोलीस स्टेशन व अॅक्सिस बँक, मार्केट यार्ड शाखा, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने गांधी चौक परिसरात सायबर फसवणूक व ऑनलाईन आर्थिक चोरी या विषयावर विशेष जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये नागरिकांना सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रकार, त्यापासून बचाव करण्याचे उपाय तसेच फसवणूक झाल्यास तातडीने कोणती पावले उचलावीत याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
सायबर गुन्ह्यांविरोधातील जनजागृती हीच सर्वात प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. नागरिकांनी डिजिटल व्यवहार करताना सतर्कता बाळगल्यास मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक टाळता येऊ शकते, असा विश्वास उपस्थित अधिका-यांनी व्यक्त केला. सदर कार्यक्रमास गांधी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील रेजीतवाड, पोलीस उपनिरीक्षक सौ. सावित्री रायपल्ले, अॅक्सिस बँक मार्केट यार्ड शाखेचे शाखा प्रमुख विलास लोखंडे, ऑपरेशन हेड दत्ता जाधव, सेल्स मॅनेजर केदार देशपांडे, गोल्ड लोन सेल्स मॅनेजर आशीष साळुंके, विभागीय अधिकारी बंडेवार, एरिया मॅनेजर जितेंद्र पाठक, वैभव चिंचणे, किशोर माने, मंगेश पवार, शुभम शेटे, प्रसाद देशपांडे, सौ. कविता चिकटे, ओम पाटील यांच्यासह बँकेचे अधिकारी-कर्मचारी, पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि मोठया संख्येने नागरिक उपस्थित होते.
















