35.1 C
Latur
Friday, May 24, 2024
Homeसंपादकीय विशेषसावधान तो पुन्हा येतोय !

सावधान तो पुन्हा येतोय !

जवळजवळ दोन मोसमांतील अनुपस्थितीनंतर नदाल हा पुन्हा टेनिसच्या मैदानावर पुनरागमन करत आहे. लाल मातीचा सम्राट म्हणून लोकप्रिय असणारा नदाल फ्रेंच स्पर्धेत पंधरावे विक्रमी विजेतेपद मिळवित कारकीर्दीची यशस्वी सांगता करण्यासाठी उत्सुक आहे. नदालची मैदानावरील उपस्थिती कायमच अन्य खेळाडू, प्रशिक्षक व प्रेक्षक यांच्यासाठी प्रेरणादायक असते. फोरहँडचे जबरदस्त फटके, टॉप स्पिन रिटर्न्स, नेटजवळून प्लेसिंगचा कल्पक खेळ, वेगवान व बिनतोड सर्व्हिस हे त्याच्या सर्वोत्तम यशाचे गमकच आहे.

टेनिसमध्ये नैपुण्यवान युवा खेळाडूंचे कौशल्य पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात पण त्यापेक्षाही त्यांना या क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या काही ‘बादशहा’ खेळाडूंच्या कामगिरीचीच उत्सुकता असते. रॉजर फेडरर, नोवाक जोकोविच व राफेल नदाल या बुजुर्ग खेळाडूंची प्रेक्षकांवर अजूनही मोहिनी कायम आहे. जवळजवळ दोन मोसमांतील अनुपस्थितीनंतर नदाल हा पुन्हा टेनिसच्या मैदानावर पुनरागमन करत आहे. फेडरर (२० विजेतेपदे), जोकोविच (२४ विजेतेपदे) व नदाल (२२ विजेतेपदे) या तीन सम्राटांनी गेली दोन दशके टेनिस क्षेत्रात निर्विवाद अधिराज्य गाजविले. या तीनही खेळाडूंनी टेनिसच्या वेगवेगळ्या मैदानांवर स्वत:च्या अलौकिक कौशल्याचा परिपाठच घालून दिला आहे. या तीनही खेळाडूंनी ग्रँड स्लॅम स्पर्धांमध्ये अजिंक्यपद मिळवण्यासाठी कोणते कौशल्य लागते, मानसिक व शारीरिक तंदुरुस्ती कशी ठेवावी, देहबोली कशी पाहिजे इत्यादी गोष्टींचा आदर्श युवा खेळाडूंपुढे ठेवला आहे. कारकीर्दीच्या शिखरावर असतानाच स्वत:च्या शारीरिक तंदुरुस्तीच्या मर्यादा ओळखून फेडरर याने स्पर्धात्मक टेनिसमधून निवृत्ती स्वीकारली. जोकोविच हा अजूनही युवा खेळाडूंच्या स्पर्धेमध्ये तुल्यबळ प्रतिस्पर्धी म्हणून मैदाने गाजवीत आहे. मांडीच्या दुखापतीमुळे ६३१ दिवस मैदानापासून दूर असलेला नदाल हा ३७ वर्षीय खेळाडू पुन्हा आता मैदान गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. लाल मातीचा सम्राट म्हणून लोकप्रिय असणारा नदाल हा आगामी फ्रेंच खुल्या स्पर्धेत विजेतेपद मिळवण्यासाठी उत्सुक आहे. त्यालाही शारीरिक तंदुरुस्तीच्या मर्यादांची जाणीव झाली आहे. त्यामुळेच फ्रेंच स्पर्धेत पंधरावे विक्रमी विजेतेपद मिळवित कारकीर्दीची यशस्वी सांगता करण्यासाठी तो उत्सुक आहे.

लाल मातीचा सम्राट
लाल मातीच्या मैदानावरील फ्रेंच स्पर्धेमध्ये नदाल याने आत्तापर्यंत चौदा वेळा विजेतेपद मिळवले आहे. या स्पर्धेमध्ये त्याने सन २००५ मध्ये पहिल्यांदा विजेतेपद पटकावले. त्यानंतर त्याने सलग तीन वेळा अजिंक्यपदावर नाव कोरले. २०१० ते २०१४, २०१७ ते २०१९, २०२० व २०२२ मध्ये तो या स्पर्धेत विजेता ठरला आहे. अन्य स्पर्धांमध्ये निर्विवाद वर्चस्व गाजविणा-या अनेक महारथींना फ्रेंच स्पर्धेच्या विजेतेपदाने हुलकावणी दिली आहे. नदाल याने मात्र या मैदानावर अजिंक्यपद मिळवण्यासाठी कोणते कौशल्य आवश्यक असते याचा आदर्शच निर्माण केला आहे. अर्थात या मैदानांबरोबरच इतर मैदानांवरही आपण सर्वोच्च कामगिरी करू शकतो हे त्याने दाखवून दिले आहे. ऑस्ट्रेलियन खुली व विम्बल्डन खुली या दोन्ही स्पर्धांमध्ये प्रत्येकी दोन वेळा तर अमेरिकन खुल्या स्पर्धेत चार वेळा तो विजेता ठरला आहे. ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांसारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत त्याने एकेरी व दुहेरी या दोन्ही गटांमध्ये प्रत्येकी एकदा सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे. सहसा डेव्हिस चषक स्पर्धेकडे अनेक मातब्बर खेळाडू वेगवेगळी कारणे देत पाठ फिरवित असतात. नदाल याने मात्र आपण वैयक्तिक महत्त्वाकांक्षेबरोबरच देशाकरताही लढतो हे दाखवून देताना पाच वेळा डेव्हिस चषक स्पर्धेत स्पेनला विजेतेपद मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला आहे. जागतिक क्रमवारीत एकेरीमध्ये तब्बल २०९ आठवडे त्याने अव्वल स्थान राखले होते. त्याची ही कामगिरी त्याच्या अलौकिक कौशल्याचे प्रतीकच आहे.

डावखुरा खेळाडू नदाल याची मैदानावरील उपस्थिती कायमच अन्य खेळाडू, प्रशिक्षक व प्रेक्षक यांच्यासाठी प्रेरणादायक असते. फोरहँडचे जबरदस्त फटके, टॉप स्पिन रिटर्न्स, नेटजवळून प्लेसिंगचा कल्पक खेळ, वेगवान व बिनतोड सर्व्हिस हे त्याच्या सर्वोत्तम यशाचे गमकच आहे. आपल्या प्रतिस्पर्धी खेळाडूच्या खेळाचा तो नेहमीच बारकाईने अभ्यास करतो. प्रतिस्पर्धी खेळाडूचा कमकुवतपणा कशात आहे हे जाणून घेऊन त्याप्रमाणे आपल्या खेळात तो बदल करीत असतो. तिशी ओलांडल्यानंतरही त्याच्या खेळातील अव्वल दर्जाचे कौशल्य कधीही कमी झालेले नाही किंबहुना प्रत्येक वर्षागणिक त्याच्या खेळातील परिपक्वता व नजाकत अधिकच वाढली आहे. टेनिस खेळाडू आणि दुखापती हे समीकरण प्रत्येक खेळाडूच्या कारकीर्दीचे अविभाज्य घटकच असते. दुखापतीवर मात करून मैदानावर यशस्वीरीत्या पुनरागमन करायचे हे नदाल याच्याकडून शिकले पाहिजे. दोन वेळा मोठ्या दुखापतींना सामोरे जाऊनही त्याने पुनरागमन केल्यानंतर ग्रँड स्लॅम स्पर्धांमध्ये वर्चस्व गाजविले आहे.

घरातच टेनिसचे बाळकडू
फुटबॉलचे माहेरघर समजल्या जाणा-या स्पेनमध्ये टेनिसही लोकप्रिय क्रीडा प्रकार मानला जातो. नदाल याचे काका मिग्वेल हे व्यावसायिक फुटबॉलपटू आहेत. त्यांच्यासारखे राफेल याने फुटबॉलपटू व्हावे अशी त्याच्या आई-वडिलांची इच्छा होती. मात्र त्याचे दुसरे काका टोनी हे स्वत: अव्वल दर्जाचे टेनिस प्रशिक्षक आहेत. राफेल याने आपल्यासारखे टेनिसपटू व्हावे अशीच त्यांची इच्छा होती. त्यांच्या आग्रहाखातर राफेल याने वयाच्या तिस-या वर्षी हातात रॅकेट घेतली आणि काकांबरोबर तो टेनिस खेळायला जात असे. अनेक वेळा टेनिसचा सराव झाल्यानंतर तो घरी परतल्यावर खूप रडत असे. त्यामुळे त्याच्या वडिलांनी अनेक वेळा त्याला फुटबॉलसाठीच प्रोत्साहन दिले. अर्थात राफेल एकाच वेळी टेनिसचा सराव करीत असे पण त्याचबरोबर घरी आल्यानंतर रस्त्यावर मित्रांबरोबर फुटबॉल सामना खेळणे त्याला आवडत असे. फुटबॉलच्या तुलनेमध्ये टेनिस हा त्याला कंटाळवाणा खेळ वाटत असे. त्यामुळे तो नाराजीनेच टेनिसचा सराव करीत असे. वयाच्या आठव्या वर्षी त्याने स्थानिक स्तरावरील स्पर्धेत बारा वर्षांखालील गटाचे विजेतेपद पटकावले. त्यावेळी तो शाळेकडून फुटबॉलही खेळत होता. मात्र अखेर त्याने टेनिसचा सराव करण्याकडे आपले लक्ष केंद्रित केले.

१९९७-९८ मध्ये त्याने स्पॅनिश कनिष्ठ गट स्पर्धेत अजिंक्यपद पटकाविले. त्यानंतर तीन वर्षांनी त्याने व्यावसायिक टेनिस क्षेत्रात पदार्पण केले. अर्थात या क्षेत्रात अव्वल यश मिळवण्यासाठी त्याला खूपच संघर्ष करावा लागला. सन २००३ मध्ये त्याने एटीपी स्पर्धांच्या मालिकेत दुहेरीचे विजेतेपद मिळवले तर दोन वर्षांनी तो फ्रेंच स्पर्धेचा विजेता ठरला. तेथूनच जगाला एक सर्वोत्तम खेळाडू मिळाला. त्यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. यशाची अनेक शिखरे त्याने पादाक्रांत करीत चाहत्यांच्या हृदयात स्थान मिळविले आहे. टेनिसच्या मैदानांवर खेळाडूंनी मारलेल्या फटक्याच्या वेळी चेंडू तेथे उपस्थित असलेल्या स्वयंसेवक (चेंडू उचलून खेळाडूंना देणारे मुले मुली), पंच, प्रेक्षकांना लागणे या घटना अनेक वेळा घडत असतात. अशा घटनेच्या वेळी नदालने संबंधित व्यक्तीच्या जवळ जाऊन त्याच्या वेदना आपल्या आदरयुक्त शब्दांद्वारे कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याची ही खिलाडूवृत्ती नेहमीच प्रेक्षकांना भावली आहे.

– मिलिंद ढमढेरे

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR