33.2 C
Latur
Friday, May 17, 2024
Homeसंपादकीयभटकते की भरकटलेले?

भटकते की भरकटलेले?

उत्तर प्रदेशनंतर लोकसभेच्या सर्वाधिक जागा असणारे राज्य म्हणून महाराष्ट्राकडे सर्वच राजकीय पक्षांचे विशेष लक्ष असणे अत्यंत साहजिकच! त्यामुळे केंद्रातील सत्तेची वाट उत्तर प्रदेशाबरोबरच महाराष्ट्रातूनही सुकर होते. ‘चारसौ पार’चे टार्गेट घेऊन लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या व तिस-यांदा सत्ताप्राप्तीचा कौल मागणा-या भाजपला हे पक्के ज्ञात आहेच! मागच्या निवडणुकीत राज्यातील जनतेने भाजप-सेना युतीला जोरदार कौल दिल्याने भाजपची केंद्रातील स्पष्ट बहुमताची वाट सुकर झाली होती. मात्र, त्यानंतरच्या पाच वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवार यांच्या पुढाकाराने घडलेल्या महाविकास आघाडीच्या प्रयोगाने सर्वांत जास्त जागा जिंकलेल्या असतानाही भाजपला विरोधी पक्षाच्या बाकावर बसावे लागले. हा प्रकार भाजपची अजेय जोडी मानल्या जाणा-या मोदी-शहा यांच्या जिव्हारी लागणाराच होता. उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडून भाजपने महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवरून खाली खेचले व एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करून सरकार स्थापन करत उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदासाठीचा ‘अतृप्त आत्मा’ ठरवण्याचा प्रयत्न केला. मात्र, घडले उलटेच! जनतेची उद्धव ठाकरेंनाच सहानुभूती मिळाली व महाविकास आघाडी विस्कळीत होण्याऐवजी आणखी एकसंध झाली. हे आव्हान मोडून काढण्यासाठी मग शरद पवारांच्या राष्ट्रवादीलाही खिंडार पाडण्याचा प्रयोग झाला. अजितदादा आपल्या शिलेदारांसह भाजपच्या छावणीत दाखल झाले. मूळ पक्ष कुणाचा? याचा जो प्रयोग शिवसेनेबाबत घडविला गेला तोच राष्ट्रवादी काँग्रेसबाबत घडविण्यात आला. या सगळ्या प्रयोगानंतर खरे तर भाजपची लोकसभेसाठीची महाराष्ट्रातील वाट निर्धोक व्हायला हवी होती.

मात्र, ना शरद पवार डगमगले ना उद्धव ठाकरे सैरभैर झाले. उलट या दोघांनी त्वेषाने आपली पक्षबांधणी सुरू केली आणि महाविकास आघाडीचे ऐक्य कायम ठेवले. हे पाहून भाजपने काँगे्रसच्या राज्यातील काही नेत्यांनाही आपल्या गळाला लावले. मात्र, तरीही भाजपची लोकसभेसाठीची वाट निर्धोक होत नाहीच. त्यामुळे भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांनी महाराष्ट्रात सभांचा धडाकाही लावला. स्वत: पंतप्रधान मोदी यांनी तिस-या टप्प्यात मतदान होऊ घातलेल्या मतदारसंघांमध्ये नुकताच दोन दिवसांत सहा सभांचा धडाका उडवून दिला व वातावरणनिर्मितीचा प्रयत्न केला. याच धडाक्यातील पुण्याच्या सभेत ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका करताना पंतप्रधानांनी त्यांना ‘भटकती आत्मा’ ठरवले. शरद पवारांनी राज्यात पुलोद सरकारचा प्रयोग केल्यापासून महाराष्ट्रात राजकीय अस्वस्थता निर्माण झाल्याची पुस्ती त्यांनी जोडली. अर्थातच त्यावरून राजकीय वादळ निर्माण होणे अपरिहार्यच! स्वत: शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीत सामील असणा-या सर्वच पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी मोदींना जोरदार प्रत्युत्तरही दिले. देशातील शेतक-यांसाठी माझा आत्मा अस्वस्थ आहे, या शब्दांत शरद पवारांनी मोदींना जोरदार प्रत्युत्तर दिले तर मोदी हेच सत्तेसाठीचे अतृप्त आत्मा असल्याची टीका संजय राऊत यांनी केली. शरद पवार देशाचा आत्मा असल्याचे जयंत पाटील यांनी मोदींना सुनावले.

‘भटकती आत्मा’ मोदी नेमके कुणाला म्हणाले हे मी पुढच्या सभेत त्यांना नक्की विचारेन, अशी सारवासारव अजित पवार यांनी केली. या सगळ्या प्रतिक्रिया अपेक्षितच! हे वादंग आता लोकसभा निवडणूक प्रचार संपेपर्यंत व त्यानंतरही सुरू राहणे अटळच! मात्र, विकसित भारताचा संकल्प करून व स्वत: विकासाचा युगपुरुष असल्याची प्रतिमा निर्माण करून तिस-यांदा सत्ता मागणा-या मोदींना महाराष्ट्रातील प्रचारात स्वत:च्या सरकारच्या कामांवर भर देण्यापेक्षा ‘भटकती आत्मा’ का आठवली असावी हा मूळ प्रश्न! या प्रश्नाचे उत्तर महाराष्ट्रात मागच्या पाच वर्षांत घडलेला जो राजकीय घटनाक्रम वर आम्ही नमूद केला आहे त्यात दडले आहे. सगळे प्रयत्न करूनही महाविकास आघाडीला महाराष्ट्रात रोखण्यात अपयशच येत असल्याच्या हताशेपोटी मोदींना ‘भटकती आत्मा’ची आठवण झालेली दिसते. मात्र, अशा वाईट आठवणी आठवल्या तरी त्यावर जाहीर सभांमध्ये हताशेने नव्हे तर संयमाने व्यक्त व्हायचे असते हे शहाणपण काही मोदी दाखवू शकले नाहीत आणि त्यातूनच पवारांना भटकती आत्मा संबोधून त्यांनी स्वत:चे व स्वत:च्या पक्षाचे भरकटलेपणच दाखवून दिले आहे.

मोदींनी ज्या पुलोद सरकारचा आपल्या टीकेसाठी आधार घेतला त्या पवारांच्या पुलोद सरकारच्या प्रयोगात मोदींच्या भाजपचा पूर्वावतार असणारा जनसंघ ज्या पक्षात विलीन झाला होता तो जनता पक्षही सहभागी होता. हा इतिहास मोदी विसरले तरी तो महाराष्ट्राच्या पक्का लक्षात आहे. त्यामुळे सध्या नेमके कोण भरकटले आहे हे राज्यातील सुजाण मतदारांच्या लक्षात आलेच असेल! असो! मोदींच्या सहा सभांमध्ये त्यांनी केलेल्या भाषणातून त्यांच्या भरकटलेपणाचे दर्शनच मतदारांना झाले आहे कारण केंद्रात व राज्यात भाजप सत्तेत असताना आपल्या सरकारने केलेल्या कामांवर व भविष्यात करावयाच्या कामांच्या योजनांवर जनतेकडे मत मागण्याऐवजी विरोधकांवर तीच ती टीका करून मत मागण्यास मोदी दहा वर्षांनंतरही प्राधान्य देत असतील तर त्यांचे सरकार स्थिर की भरकटलेले? हा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाहीच. मोदी उत्तम वक्ते आहेत व त्यांची भाषणे प्रभाव निर्माण करतात हे सत्य! मात्र, या भाषणांमध्ये सत्यांशही असायला हवा. कामाच्या बळावर आपण तिस-यांदा सत्तेवर येऊ शकतो,

याचा स्वत: मोदी यांनाच विश्वास नसल्याचे त्यांच्या भरकटलेपणातून व विरोधकांवरील टीकेवरून स्पष्ट होते. त्यातूनच त्यांनी महाराष्ट्रातील प्रचाराची विकासकेंद्री दिशा भरकटवण्यासाठीचा मुद्दा उपस्थित केल्याचे स्पष्ट होते. आता त्याला तेवढेच जोरदार प्रत्युत्तर मिळणे अत्यंत साहजिक व अटळच! तसे होणे सुरूही झाले आहे. व प्रचार संपेपर्यंत ते सुरूच राहणार आहे. दुर्दैवाने या सगळ्या प्रकारात जनतेचे मूळ प्रश्न, व्यथा, समस्या, अडचणी हे मुद्देच निवडणूक प्रचारातून अडगळीत टाकले जाणार आहेत. सध्याची सर्वच राजकीय पक्षांच्या प्रचाराची दिशा पाहता हे भरकटलेपण पदोपदी अनुभवावयास मिळते आहे. ज्यांनी हे थांबवायचे त्यांनीच यात आपल्या वक्तव्यांनी आणखी भरच घालावी, हे लोकशाहीचे दुर्दैवच, हे मात्र निश्चित!

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR