नवी दिल्ली : वृत्तसंस्था
अमेरिकेने इराणच्या नतान्झ, इस्फहान आणि फोर्डो या अणुसंशोधन केंद्रांवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने हल्ला केला. या हल्ल्यानंतर आता इराणने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना इशारा दिला आहे.
दरम्यान, इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या संघर्षाने आता एक नवीन वळण घेतले आहे. यात पहिल्यांदाच अमेरिकन सैन्याने थेट हस्तक्षेप करून इराणच्या तीन प्रमुख अणुसंशोधन केंद्रांवर हल्ले केले आहेत. इस्फहान, नतान्झ आणि फोर्डो याठिकाणी अमेरिकन सैन्याने हल्ले केले. या हल्ल्यानंतर इराणने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना इशारा दिला आहे. सुरुवात तुम्ही केली, आता शेवट आम्ही करू.. असा थेट इशारा इराणने दिला आहे. इराणी माध्यमांनी अमेरिकेच्या या हल्ल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
अमेरिकन सैन्याने अत्याधुनिक क्षेपणास्त्र प्रणाली आणि ड्रोन वापरून अणुसंशोधन केंद्रांवर हल्ला केल्याची माहिती आहे. परंतु इराणी वृत्तवाहिन्यांनी असाही दावा केला की त्यांनी अमेरिकेच्या या हल्ल्यापूर्वी त्यांचे युरेनियम साठे दुसरीकडे हलवले होते. मार्च २०२५ मध्येच इराणने त्यांची संवेदनशील अणु उपकरणे सुरक्षित ठिकाणी पाठवण्याची योजना आखली होती. इराण आणि इस्रायलच्या या संघर्षात अमेरिका इस्रायलला साथ देत आहे.
इराणसारख्या इस्लामिक देशाला अणुबॉम्ब मिळवण्यापासून रोखणे हा दोघांचाही उद्देश आहे. जर इराण असे करण्यात यशस्वी झाला तर ते त्यांच्यासाठी अडचणीचे कारण बनेल, अशी त्यांना भीती आहे.
दरम्यान अमेरिकेने या संघर्षात सहभागी होऊ नये, असा इशारा इराणने शनिवारी दिला. ‘तसे झाल्यास ते अतिशय धोकादायक असेल, असे इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघाची म्हणाले. त्यांनी शुक्रवारी जीनिव्हामध्ये युरोपीय महासंघाचे राजनैतिक अधिकारी आणि फ्रान्स, जर्मनी, ब्रिटनच्या परराष्ट्रमंत्र्यांशी चर्चा केली. मात्र त्यामधून कोणताही मार्ग निघू शकला नाही. तर दुसरीकडे इराणबरोबर सुरू असलेल्या लष्करी संघर्षात इस्रायलने त्या देशाच्या अणुसंशोधन केंद्रावर हल्ला केला आणि त्यांच्या तीन वरिष्ठ कमांडरना ठार केले, अशी माहिती इस्रालयच्या लष्कराने दिली.