29.8 C
Latur
Thursday, May 30, 2024
Homeउद्योगसोन्या-चांदीच्या किमतीचा नवा उच्चांक?

सोन्या-चांदीच्या किमतीचा नवा उच्चांक?

इराण-इस्राईल युद्धाचा परिणाम, एप्रिलमध्ये रेकॉर्डब्रेक वाढ, आणखी वाढण्याचा धोका

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
मागील काही दिवसांपासून सोन्याच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. जागतिक स्तरावर तसेच भारतातदेखील सोन्याच्या किमतींनी उच्चांक गाठला आहे. यासोबतच चांदीच्या किमतीदेखील रेकॉर्ड ब्रेक वाढल्या आहेत. यातच आता इराण-इस्त्राइल यांच्यात संघर्ष पेटला असून याचा परिणाम सोन्याच्या किमतीवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या तणावाच्या स्थितीत सोन्या-चांदीच्या किमती अजून वाढतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

मागच्या काही महिन्यांपासून सोने, चांदीच्या किमती वाढत आहेत. दरमहा टप्प्याटप्प्याने किमती वाढत असल्याने आता सोने खरेदी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे. मार्च महिन्यात सोन्याच्या किमतीत १० टक्के वाढ झाली होती. त्यानंतर एप्रिल महिन्यात सोन्याच्या दरात रेकॉर्ड ब्रेक वाढ पाहायला मिळाली. फेड रिझर्व्हने जारी केलेल्या महागाई आकड्यांनंतर सोन्याची किंमत वाढण्यास सुरुवात झाली आहे. यासोबतच इस्त्राइल आणि इराण यांच्यातील तणाव वाढल्याने सोने आणखी महागण्याच्या शक्यता आहेत. एप्रिल महिन्यात सोन्याचे दर दिल्लीत २४ कॅरेटसाठी ७४ हजार रुपयांपर्यंत पोहोचला आहेत.

एप्रिलमध्ये ९ दिवसांमध्ये ७०६०५ रुपये प्रति १० ग्रॅम वरून ३७६५ रुपयांची वाढ पाहायला मिळाली असून तो आता ७४,३७० रुपये प्रति ग्रॅमवर पोहोचला आहे. याप्रमाणे चांदीचे भावदेखील वाढले आहेत. १ एप्रिल रोजी सराफा बाजारात ७८ हजार रुपये प्रतिकिलो भाव होता. आता तो ८५ हजार ५०० प्रति किलो झाला आहे. सोने आणि चांदी ही सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. अशा परिस्थितीत युद्ध किंवा वाढत्या महागाईच्या काळात लोक जास्त धोका न पत्करता सोने-चांदीसारख्या धातूंमध्ये गुंतवणूक करतात. आता इराण-इस्त्राइल यांच्यात युद्ध सुरू झाले आहे. त्यातच सोन्याची मागणी वाढल्याने किमती देखील वाढत आहेत.

भारतात मागणी वाढणार
भारतात दागिन्यांची मागणी वाढणार आहे. कारण काही दिवसांत लग्नाचा हंगाम सुरू होत आहे. यादरम्यान सोने आणि चांदीची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते. २०२२ मध्ये १,०८१.९ टन आणि २०२३ मध्ये १,०३७.४ टन ची रेकॉर्डब्रेक खरेदी झाली होती. ज्यामुळे २०२४ मध्ये देखील रेकॉर्डब्रेक खरेदी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. म्हणून सोने आणि चांदींच्या दरात अजून वाढ होण्याची शक्यता आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR