34 C
Latur
Friday, May 10, 2024
Homeसंपादकीय विशेषबिनशर्त पाठिंब्याचे ‘राज’कारण !

बिनशर्त पाठिंब्याचे ‘राज’कारण !

‘देशात लोकशाही टिकणार की हुकूमशाही येणार हे ठरवणारी ही निवडणूक आहे. हा देश टिकवण्यासाठी मोदी-शहा यांना राजकीय क्षितिजावरून हद्दपार करा….’ आज देशाला चांगल्या खंबीर नेतृत्वाची गरज आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी मी, माझा पक्ष भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत आहे….! ही दोन्ही वाक्यं आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची. पहिले वाक्य आहे २०१९ च्या निवडणुकीतले. तर दुसरे वाक्य आहे मागच्या आठवड्यात झालेल्या त्यांच्या पक्षाच्या पाडवा मेळाव्यातले. याच आशयाचे वाक्य त्यांनी २०१४ च्या निवडणुकीतही मोदींना पाठिंबा देताना वापरले होते. याचाच अर्थ दर पाच वर्षांनी त्यांच्या भूमिकेत टोकाचा बदल झाला आहे. तरीही ते सांगतात की माझे धोरण तेच आहे. दर पाच वर्षांनी वेगळ्या पक्षाला पाठिंबा द्यायचा हेच त्यांचे धोरण असेल तर हा युक्तिवाद मान्य करावाच लागेल. कारण त्यात त्यांनी सातत्य ठेवलेय. पाडव्याला घरावरचे तोरण बदलावे तसे पक्षाचे धोरण बदलायचे त्यांनी ठरवले असेल तर तो त्यांचा अधिकार आहे.

गेल्या तीन वर्षांतील त्यांचे राजकारण बघता ते यावेळी महायुतीला पाठिंबा देणार हे अपेक्षितच होते. फक्त ते प्रत्यक्ष महायुतीत सहभागी होऊन काही जागा लढवणार की बाहेरून पाठिंबा देणार? एवढेच कुतुहल होते. अपेक्षेप्रमाणे त्यांनी बाहेरून बिनशर्त पाठिंबा देताना आवश्यकता भासल्यास पुन्हा य-टर्न घेण्याचा पर्याय खुला ठेवलेला दिसतोय. या पार्श्वभूमीवर मनसेचे भवितव्य काय? पाठिंबा ही त्यांची गरज होती की महायुतीची? या पाठिंब्यामुळे महायुतीला किती फायदा होईल? राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. याचा अर्थ काय? विधानसभेची निवडणूक ते महायुतीतून लढणार आहेत की स्वबळावर? लोकसभेच्या दोन जागा सोडायला खळखळ करणारे महायुतीतील पक्ष विधानसभेत त्यांना किती जागा देतील? असे अनेक प्रश्न आता चर्चेत आहेत. राज ठाकरे यांनाही पक्षाच्या भविष्याबद्दल एवढे प्रश्न पडत नसतील, चिंता वाटत नसेल, जेवढी चिंता राजकीय पंडितांना वाटतेय. चालायचंच.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी भाजपाविरोधात रान उठवले होते. स्वत: लोकसभेची निवडणूक न लढवता काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दिला. त्यांच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेतल्या. आघाडीचे नेते सावधपणे बोलत असताना राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे तत्कालीन अध्यक्ष अमित शहा यांच्यावर घणाघाती टीका केली. परंतु त्या निवडणुकीत भाजपाने २०१४ पेक्षा मोठा विजय मिळवला. महाराष्ट्रातही त्यांना ४८ पैकी ४१ जागा मिळाल्या. लोकसभेच्या निकालानंतर दोन काँग्रेसमध्ये पळापळ उडाली. अनेक नेते भाजपाच्या सावलीला गेले. त्यामुळे विधानसभा निवडणूक आघाडीच्या नेत्यांनी फारशा गांभीर्याने घेतलीच नाही. राज ठाकरे यांना आघाडीत घेण्याचा प्रयत्न ना दोन काँग्रेसच्या नेत्यांनी केला, ना राज ठाकरे यांनी त्यादृष्टीने काही विचार केला. उलट वेगळे लढून २०१४ एवढे, किंवा त्यापेक्षाही जास्त आमदार निवडून आणू शकू असे त्यांना वाटत होते. पण तसे झाले नाही. कसाबसा एक आमदार, तोही स्वत:च्या बळावर निवडून आला. मात्र या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात मोठी राजकीय उलथापालथ झाली व उद्धव ठाकरेंनी दोन काँग्रेससोबत महाविकास आघाडी स्थापन केली. त्यांचे सरकार सत्तेवर आले.

उद्धव ठाकरेंमुळे दोन काँग्रेसला ‘अच्छे दिन’आले. राज ठाकरे आपोआपच बाजूला पडले. त्यामुळे त्यांनी पुन्हा आपल्या इंजिनाची दिशा बदलली. जोपर्यंत मराठीच्या मुद्यावर आपण आक्रमक भूमिका घेत आहोत तोवर भाजपाला आपल्यासोबत युती करण्यात अडचण येत राहणार याची जाणीव त्यांना होती. त्यामुळे त्यांनी हळुवारपणे आपल्या पक्षाला हिंदुत्वाकडे नेले. मशिदीवरील भोंगे, हनुमान चालीसासारखा मुद्दा आक्रमकपणे लावून धरला. शिवसेनेच्या बदललेल्या भूमिकेमुळे रिकामी झालेली जागा भरण्याचा प्रयत्न सुरू केला. यामुळे त्यांच्या पक्षाचे बूड थोडे स्थिरावतेय असे वाटत असताना महाराष्ट्रात पुन्हा राजकीय उलथापालथ झाली. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला शिंडार पाडले. चाळीस आमदार घेऊन भाजपाकडे गेले. त्यामुळे राज्यात सत्तांतर झाले. २०१९ पासून एकाकी पडलेल्या भाजपाला राज ठाकरे यांची तेवढी गरज वाटेनाशी झाली. नंतर अजित पवारही राष्ट्रवादी फोडून सत्तेसोबत आले. त्यामुळे विधिमंडळात सरकारकडे पाशवी बहुमत झाले. पण नेते आले तरी त्यांचा मतदार आपल्या सोबत आलेला नाही. उलट दोन पक्ष फोडल्याने, मूळ संस्थापकांपासून त्या पक्षाचे अपहरण केल्यामुळे जनमत विरोधात जातेय, याची जाणीव भाजपाला झाली व त्यांना मनसेची गरज भासली.

एक ठाकरे सोबत असावा यासाठी अट्टाहास !
शिवसेनेच्या आजच्या अवस्थेला उद्धव ठाकरे हे ही तेवढेच जबाबदार असले तरी सर्वस्व गमावलेल्या उद्धव ठाकरे यांना सहानुभूती आहे. ते भाजपाबरोबर संघर्ष करतायत. भाजपाने स्व. बाळासाहेबांची शिवसेना फोडली, भाजपा मराठीविरोधी आहे, महाराष्ट्रविरोधी आहे, प्रादेशिक पक्षांना गिळंकृत करतेय, महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला पळवत आहे, हा त्यांच्या प्रचार मोहिमेचा गाभा आहे. याचा प्रतिवाद करायचा असेल तर राज ठाकरे आपल्यासोबत असावेत असे भाजपाला वाटत असावे. मनसेने नेहमीच प्रादेशिक अस्मितेची भूमिका मांडली आहे, ते ठाकरे आहेत, चांगले वक्ते आहेत. मागच्या विधानसभा निवडणुकीत मनसेला अवघी सव्वादोन टक्के मतं मिळाली होती. विधानसभेला १०१ उमेदवार उभे करून केवळ एक जागा मिळाली. सर्व उमेदवारांना मिळून केवळ १२ लाख ४२ हजार ४३५ मतं होती. पाठिंबा दिल्यामुळे ही मतं महायुतीकडे जातील, असेही नाही. तरीही ‘पर्सेप्शन’ साठी त्यांचे सोबत असणे उपयोगी ठरेल, अशी अपेक्षा भाजपाला असावी. महाराष्ट्रात दोन पक्ष फुटून शंभरावर आमदार सोबत आले तरी भाजपाला आणखी काहीतरी पाहिजे असे सतत वाटतेय. त्यामुळेच त्यांची भूक शमत नाही. काँग्रेसमधील नेत्यांनाही खेचण्याचा सतत प्रयत्न सुरू आहे. जेव्हा तुम्हाला आणखी काही तरी हवंय असं वाटतं, तेव्हा त्याचा दुसरा अर्थ तुमच्याकडे जे आहे ते पुरेसे नाही, हा असतो. भाजपलाही कदाचित आपल्याकडे जे आहे ते विजयासाठी पुरेसे नाही याची जाणीव असावी. त्यामुळे अमित शहा यांनी स्वत: राज ठाकरे यांना दिल्लीत बोलावून चर्चा केली. ज्या उद्देशाने हे केले गेले तो पूर्ण होणार की नाही हे लोकसभा निवडणुकीचे निकाल लागतील तेव्हाच कळेल.

बाहेरून पाठिंब्याने मनसेला काय मिळणार?
राज ठाकरे यांनी महायुतीत सहभागी होऊन काही जागा लढवाव्यात अशी भाजपची अपेक्षा होती. त्यानुसार दिल्लीतून परतल्यावर जागांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व राज ठाकरे यांची एक बैठकही झाली. पण राज यांना दक्षिण मुंबई, नाशिक व ठाणे किंवा कल्याण यापैकी एक अशा तीन जागा हव्या होत्या. या सगळ्या जागांवर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा क्लेम होता. त्यामुळे दक्षिण मुंबई ही एकमेव जागा घेऊन लढायचे की बाहेरून पाठिंबा द्यायचा एवढाच पर्याय राज ठाकरे यांच्यासमोर होता. त्यात आमच्या चिन्हावर मनसेने निवडणूक लढवावी असे आपल्याला सांगण्यात आले होते, असा गौप्यस्फोट स्वत: राज ठाकरे यांनीच केला. त्यामुळे त्यांनी दुसरा पर्याय निवडला. मनसेला विधानसभा निवडणुकीत महायुतीत सन्मानाने स्थान देऊ असे सांगण्यात आले असल्याचे काही लोक खाजगीत सांगतात. पण राजकारणात भविष्यातील वायद्यांवर किती विश्वास ठेवायचा हा प्रश्नच असतो. शिवाय ज्यांच्यामुळे सत्ता मिळाली, ज्यांच्यामुळे ती मजबूत होऊन विरोधक विकलांग झाले त्या एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षाला जागावाटपात किती सन्मान मिळतोय ते दिसतेच आहे. दिल्लीत झालेल्या चर्चेत मी स्वत: व अमित शहा असे दोघेच होतो, असे राज ठाकरे यांनी सांगितले.

बंद खोलीत अमित शहा यांनी काही वेगळं आश्वासन दिले आहे का? ते पूर्ण केले की नाही? हे सुद्धा ते दोघेच भविष्यात सांगू शकतील. त्यामुळेच आजपर्यंत ‘राज साहेब बांधतील ते तोरण व सांगतील ते धोरण’ या निष्ठेने काम करणा-या मनसैनिकांमध्ये यावेळी संभ्रम दिसतो आहे. काही लोकांनी उघडपणे आपल्या भावना व्यक्त करून पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ही केला आहे. राज ठाकरे यांनाही ‘लाव रे तो व्हीडीओ’ म्हणत मोदी- शहांवर केलेल्या टीकेबाबत स्पष्टिकरण करावे लागत आहे. राज ठाकरे यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव असलेला, त्यांच्या वक्तृत्वाचं गारुड असलेला मोठा तरुणवर्ग महाराष्ट्रात आहे. पण सततच्या बदलत्या भूमिकेमुळे मनसेच्या विस्ताराला खीळ बसली आहे. यावेळी विरोधकांनीच नव्हे तर सर्वसामान्य लोकांनीही बदललेल्या भूमिकेवरून राज ठाकरे यांना ‘ट्रोल’ केले. ‘महाराष्ट्राने राजकीय व्यभिचाराला मान्यता देऊ नये’ असे आवाहन करताना, तोडफोडीचा व तत्त्वशून्य राजकारणाचा आरोप असलेल्यांनाच पाठिंबा देण्याच्या निर्णयाची खिल्ली उडवली जात आहे. भविष्यातील राजकीय दिशा निश्चित करताना हा अनुभव त्यांना उपयोगी ठरेल एवढं नक्की.

अभय देशपांडे

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR