सोलापूर : उन्हाळा सुरू झाला असून तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. कमाल तापमान ३९.४ अंशांवर गेला आहे. तप्त उन्हात नागरिक उष्माघाताला बळी पडू नयेत, त्यांचे आरोग्य जपले जावे, यासाठी आरोग्य विभाग उष्माघात कृती आराखडा राबविणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने यांनी दिली.
वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात येणाऱ्या कृती आराखड्यामध्ये दुपारी वाहतूक सिग्नल बंद ठेवणे, दुपारी सार्वजनिक खेळांचे आयोजन न करणे, सार्वजनिक बगीचांच्या वेळेत वाढ करणे, बांधकाम कंत्राटदाराद्वारे मजुरांच्या कामाच्या वेळेत बदल व उष्माघातासाठीची जनजागृती करणे आदी बाबींचा या उष्माघात कृती आराखड्यात समावेश असणार आहे. वाढत्या उन्हामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे.
नागरिकांनी कुलरसह, उष्णतारोधक रंग घराच्या छतावर मारल्यास २ ते ३ डिग्री तापमान कमी होण्यास मदत होईल. शहरात विविध जागी सेवाभावी संस्थांतर्फे पाणपोईची व्यवस्था केल्यास नागरिकांची सोय होईल. बेघर लोकांसाठी व उन्हाळ्यात नागरिकांसाठी पोलिस प्रशासन, स्वयंसेवी संस्थांसह इतरांनी सहकार्य करण्याचे आवाहन या निमित्ताने डॉ. राखी माने यांनी केले आहे.
उन्हाळ्यात हमाल, शेतमजूर, वीटभट्टी कामगार, फार वेळ काम करणे, कारखान्याच्या बॉयलर रूममध्ये काम करणे, अधिक तापमानाच्या खोलीत काम करणे, घट्ट कपड्यांचा वापर करणाऱ्यांना उष्माघाताचा त्रास होऊ शकता. तर उष्माघाताची लक्षणे म्हणजे थकवा येणे, ताप येणे, त्वचा कोरडी पडणे, भूक न लागणे, पोटऱ्यात वेदना किंवा गोळे येणे, डोके दुखणे, रक्तदाब वाढणे, मानसिक बेचैनी, अस्वस्थता, बेशुद्ध अवस्था ही लक्षणे आहेत.