सोलापूर : शहर व जिल्ह्यात नागरिक घरात नसतानाही जबरदस्तीने अदानी कंपनीकडून स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरू आहे. यास जनतेमधून तीव्र विरोध होत आहे. महायुती सरकार स्मार्ट मीटर जनतेवर थोपवत आहे. स्मार्ट मीटरमुळे नागरिकांना पूर्वीपेक्षा दुप्पट, तिप्पट वीज बिल येणार आहे. किरकोळ वापरकर्त्यांनासुद्धा भरमसाठ वीज बिलाचा भुर्दंड बसणार आहे. त्यामुळे स्मार्ट मीटर हटवून जनतेची लूट थांबविण्यात यावी, अन्यथा काँग्रेस पक्ष आंदोलन तीव्र करेल, असा इशारा खासदार प्रणिती शिंदे यांनी दिला.
जुनी मिल कंपाउंड येथील महावितरणच्या कार्यालयासमोर स्मार्ट मीटरविरोधात काँग्रेसच्यावतीने खासदार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. त्यावेळी खासदार शिंदे यांनी सरकारवर टीकेची झोड उठवत स्मार्ट मीटरची सक्ती मागे घेण्याची मागणी केली. यावेळी स्मार्ट मीटर, अदानी आणि सरकारविरुध्द कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणाबाजीने जुनी मिल कंपाउंड परिसर दणाणून गेला होता. यानंतर खासदार शिंदे, काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता संपत गावडे यांना निवेदन दिले.
यावेळी काँग्रेसचे प्रदेश सचिव विनोद भोसले, सेवादल काँग्रेसचे अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, राहुल वर्धा, मनोज यलगुलवार, महिला अध्यक्षा प्रमिला तुपलवंडे, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, माजी नगरसेवक मधुकर आठवले, एन. के. क्षीरसागर, प्रदेश सेवादल यंग ब्रिगेड अध्यक्ष सुदीप चाकोते, तिरुपती परकीपंडला यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.स्मार्ट मीटरच्या माध्यमातून जबरदस्तीने वसूल केलेले वीज बिलाचे पैसे अदानी आणि सरकारच्या खात्यात जाणार आहेत. म्हणून या स्मार्ट मीटरला जनतेचा आणि काँग्रेस पक्षाचा विरोध आहे. घरी कोणीही नसताना स्मार्ट मीटर बसविण्यात येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहिले पाहिजे. स्मार्ट मीटर बसवायला आले तर नागरिकांनी विरोध करावा, असे आवाहन खासदार प्रणिती शिंदे यांनी केले.