लातूर : एजाज शेख
सध्याच्या दुष्काळी परिस्थितीमुळे कुठलाही खर्च करु नका. १५ व्या वित्त आयोगाचा सर्व निधी जलसंधारणावर खर्च करा, असे आदेश राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतींना दिले आहेत. परंतु, आराखडा बदलला नाही. परिणामी आराखड्याची नियमावली तोडता येत नाही. नियमावली न बदलता जलसंधारणावर खर्च कसा करायचा?, असा प्रश्न ग्रामपंचायतींना पडला आहे. निधी असूनही खर्च करता येत नसल्याने १५ व्या वित्त आयोगाचा निधी आराखड्यात अडकला आहे.
विशेष म्हणजे जलसंधारणाची कामे करताना बोअरवेल घेण्याच्या सूचना आहेत. बोअरवेल फक्त २०० फुटांपर्यंतच घ्या, अशा स्पष्ट सूचना आहेत. दुष्काळामुळे लातूर जिल्ह्यातील पाणीपातळी खोल-खोल गेली आहे. अशा परिस्थितीत २०० फुटााच्या बोअरवेलला पाणी लागणार आहे का?, याचा विचार झालेला नाही. आराखड्याच्या नियमावलीत राहूण जलसंधारणाची कामे करणे शक्य आहे काय?, याचा विचार झालेला नाही. त्यामुळे १५ व्या वित्त आयोगाचा निधी शिल्लक असूनही ग्रामपंचायतींना निधी खर्च करता येत नाही, अशी एकंदर परिस्थिती आहेत.
‘डीपीसी’चा १० टक्के निधी दुष्काळ निवारणावर खर्च होणार
लातूर जिल्हा नियोजन समितीचा (डीपीसी) ४८४ कोटींचा प्लॅन आहे. त्यातील १० टक्के रक्काम ही दुष्काळ निवारणावर खर्च करावयाचा आहे. ४८४ कोटींच्या १० टक्के म्हणजेच ४८ कोटी रुपये दुष्काळ निवारणावर खर्च होणार आहे, असे असले तरी जिल्ह्याचा आराखडा हा महसूल विभागामार्फत तयार केला जातो. त्यास शासनाकडून मंजूरी मिळते. त्यामुळे ही मंजुरी कशी मिळते, यावर सर्व गोष्टी अवलंबून आहेत, असे जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी यांनी सांगीतले.
१६ व्या वित्त आयोगाचा निधी द्यावा
आमच्या ग्रामपंचायतीत १५ व्या वित्त आयोगाचा निधी शिल्लक आहे. परंतु, आराखड्याची नियमावरली मोडून जलसंधारणाची कामे करता येत नाहीत. याबाबत शासनाकडून विचार व्हावा. १६ व्या वित्त आयोगाचा आराखडा तयार आहे. पण निधीच नाही. जलसंधारणाच्या कामात बोअरवेल घ्या, असे निर्देश आहेत. परंतू, बोअरवेल घेतल्यानंतर त्यासाठी मोटार कोठून आणायची?, याबाबत सूचना नाहीत.
-सचिन सूर्यवंशी, सरपंच, शिऊर ता. लातूर.
















