मु्ंबई : प्रतिनिधी
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीसंबंधी नवीन वेळापत्रक जारी केले आहे. नवीन वेळापत्रकानुसार शिंदे गटाच्या नेत्यांचीही उलटतपासणी होणार आहे. नव्या वेळापत्रकानुसार ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची उलटतपासणी ३० नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. त्यानंतर १, २, ७, ८ डिसेंबर यादरम्यान शिंदे गटाची उलट तपासणी होणार आहे. त्यानंतर ११ ते २० डिसेंबरदरम्यान अंतिम सुनावणी होईल. त्यानंतर २१ आणि २२ डिसेंबर हे अधिक दोन दिवस दिले जाणार आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना ३१ डिसेंबरपर्यंत अंतिम निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे राहुल नार्वेकर यांना या प्रकरणात सुनावणी आटोपताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. त्यासाठी ओव्हर टाईमही करावा लागणार आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या सुनावणीत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुनावणीतील साक्ष नोंदवणे, उलट तपासणीतील संथगतीबाबत नाराजी व्यक्त केली होती.
दरम्यान, आमदार सुनील प्रभू आणि कार्यालय सचिव विजय जोशी यांची उद्या ३० नोव्हेंबर रोजी उलट साक्ष घेतली जाणार आहे तर १ डिसेंबरपासून शिंदे गटाच्या नेत्यांची उलट साक्ष घेतली जाणार आहे.
शिंदे गटातील पाच आमदार,
१ खासदारांची उलटसाक्ष
शिंदे गटातील पाच आमदार आणि एक खासदारांची उलट साक्ष होणार आहे. आमदार भरतशेठ गोगावले, दीपक केसरकर, उदय सामंत, योगेश कदम, दिलीप लांडे आणि खासदार राहुल शेवाळे यांची उलट साक्ष नोंदवली जाणार आहे.
१ डिसेंबरपासून शिंदे गटाची उलटतपासणी
नवे वेळापत्रक, प्रभूंच्या उलटतपासणीचा आज अखेरचा दिवस