31 C
Latur
Wednesday, May 22, 2024
Homeमहाराष्ट्रएकनाथ शिंदेंना पाठविलेल्या ईमेलवरून खडाजंगी!

एकनाथ शिंदेंना पाठविलेल्या ईमेलवरून खडाजंगी!

मुंबई : एकनाथ शिंदे यांना पाठविण्यात आलेला ईमेल बनावट असल्याच्या मुददयावरून शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या वकिलांत जोरदार खडाजंगी झाली. शिंदे यांचा ई मेलआयडी बनावट असल्याचा आरोप शिंदे गटाचे वकिल महेश जेठमलानी यांनी केला. त्यावर शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांचे वकिल देवदत्त कामत यांनी संताप व्यक्त करताा या ईमेलची शहानिशा करण्याची मागणी केली.

शिवसेना आमदार अपात्रतेच्या संदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे. सुनावणीच्या सहाव्या दिवशी एकनाथ शिंदे यांना पाठविण्यात आलेल्या ई मेलआयडीच्या मुद्यावरून खडाजंगी झाली. महेश जेठमलानी यांनी एकनाथ शिंदे यांच्या ई मेलआयडीवरून शिवसेना ठाकरे गटाचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांची उलटतपासणी घेतली. आपण ज्या ईमेलवर एकनाथ शिंदे यांना ई मेल पाठवला तो वाचून दाखवण्यास महेश जेठमलानी यांनी प्रभूंना सांगितल्यावर तो मेल आयडी प्रभूंनी वाचून दाखविला आणि हा ईमेल महाराष्ट्र विधानसभा डायरीतून घेतल्याचे स्पष्ट केले. त्यावर आपण २२ व २३ जून २०२२ रोजी शिंदे यांच्या या ईमेलवर व्हीप पाठवला नव्हता असा आक्षेप महेश जेठमलानी यांनी केला.

एकनाथ शिंदे यांचा बनावट ई मेल तयार करण्यात आल्याचा आरोप महेश जेठमलानी यांनी केला. त्यावर हे खोट असल्याचे प्रभू यांनी सांगितले. पण तरीही एकनाथ शिंदे यांचा ईमेल बनावट असल्याच्या आरोपावर महेश जेठमलानी ठाम राहिले. त्यावर प्रभू यांचे वकिल देवदत्त कामत संतप्त होत म्हणाले, प्रत्येक गोष्ट तुम्ही बनावट असल्याचे सांगत आहात. ईमेल बनावट असल्याचा आरोप करून प्रसिध्दी मिळवत आहात. ईमेलची तज्ज्ञांकडून खातरजमा करून घ्या, तुम्ही वेळेचा अपव्यय करीत आहात अशा शब्दात कामत यांनी संताप व्यक्त केला. तसेच तो ईमेल ज्यांनी पाठवला त्यांना सुनावणीत बोलवा आणि विधानसभा अध्यक्षांसमोरच तो ई मेल ओपन करून दाखवतो. शिवाय अपात्रतेची याचिकाही शिंदे यांना त्याच ईमेलवर पाठवण्यात आल्याचेही कामत म्हणाले.

त्यापूर्वी सकाळी झालेल्या सुनावणीतही शिवसेनेच्यावतीने केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेले पत्र बनावट असल्याचा आरोप महेश जेठमलानी यांनी केला. शिवसेनेने केंद्रीय निवडणूक आयोगाला २ एप्रिल २०१८ रोजी पाठवलेली घटनादुरुस्तीची कागदपत्रेही बनावट असल्याचा आरोप महेश जेठमलांनी यांनी केला. त्यावर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अधिका-याना सुनावणीसाठी समन्स पाठवण्याची मागणी प्रभू यांच्या वकिलांनी केली. तसे पत्रही शिवसेनेच्यावतीने विधानसभा अध्यक्षांना पाठवण्यात आले. पण या सुनावणीसाठी केंद्रीय निवडणूक आयुक्त आपण दिलेल्या तारखेला येतील का हे आपल्याला माहिती नाही. नव्याने अर्ज केला तर सुनावणीत वेळ वाढेल त्यावर प्रभू यांच्या वकिलांनी या अर्जासाठी आम्ही आग्रह करीत नाही मग मागेही घेत नाही मात्र आमचे हे पत्र ‘रेकाँर्ड’वर घेण्यात यावे अशी मागणी प्रभू यांच्या वकिलांनी केली.

लबाडी आणि फसवणूक लपविण्यासाठीच प्रभूंचे डावपेच
सुनील प्रभू यांनी निवडणूक आयोगाच्या अधिका-यांना अपात्रतेच्या कारवाईत साक्षीदार म्हणून बोलावण्यासाठी विधानसभाध्यक्षांकडे याचिका दाखल केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात खटला उभा करताना शपथेखाली खोटे बोलणे आणि खोटी व बनावट कागदपत्रे सादर केल्याबद्दल प्रभू हे उलटतपासणी दरम्यान उघड झाले आहेत. प्रभू त्यांची लबाडी आणि फसवणूक लपविण्यासाठी असे डावपेच अवलंबत आहेत अशी टीका उदयोगमंत्री उदय सामंत यांनी केली आहे. प्रभू यांनी एकनाथ शिंदे यांना बजावलेल्या व्हीपचा पुरावा ईमेल्सच्या स्वरूपात भौतिक पुरावे तयार केल्याचे आता पुराव्यानिशी सिद्ध झाले आहे. आम्ही या प्रकरणाची अधिक चौकशी करण्यासाठी याचिका दाखल केली आहे आणि प्रभू हे निवडणूक आयोगाच्या अधिका-यांना कारवाईत सहभागी करून कारवाईला विलंब करण्याचा आणि त्यांच्या गैरवर्तणुकीपासून लक्ष हटवण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्हाला शंका आहे की प्रभू त्यांची लबाडी आणि फसवणूक लपविण्यासाठी असे डावपेच अवलंबत आहेत. ते आता वेळखाऊ डावपेचाने कारवाईचे नुकसान करत आहेत. महाराष्ट्र विधानसभेचे आगामी हिवाळी अधिवेशनही बाधित करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचेही सामंत म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR