मुंबई : प्रतिनिधी
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस पुन्हा एकदा २०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणामुळे चर्चेत आली आहे. बुधवारी (३ जून) ती दिल्लीतील पटियाला हाऊस न्यायालयात हजर झाली. सुनावणीदरम्यान जॅकलिनने न्यायालयासमोर आपली बाजू मांडत तिच्यावर केलेले सर्व आरोप स्पष्टपणे नाकारले. तिच्याविरोधात करण्यात आलेले आरोप निराधार असल्याचा दावा तिने केला. सुनावणीनंतर मात्र तिने प्रसारमाध्यमांशी संवाद टाळण्याचा प्रयत्न केला.
हे संपूर्ण प्रकरण ठग सुकेश चंद्रशेखर याच्याशी संबंधित आहे. सुकेशवर एका उद्योगपतीच्या पत्नीची फसवणूक करून सुमारे २०० कोटी रुपये उकळल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचा तपास सक्तवसुली संचालनालय (ईडी) करत असून, तपासादरम्यान अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ईडीच्या आरोपांनुसार, सुकेशने फसवणुकीतून मिळालेल्या पैशांचा वापर जॅकलिन फर्नांडिस आणि तिच्या कुटुंबावर खर्च करण्यासाठी केला. तपास यंत्रणेच्या म्हणण्यानुसार, जॅकलिनला महागड्या भेटवस्तू देण्यात आल्या होत्या. यामध्ये आलिशान गाड्या, महागडे दागिने, डिझायनर हँडबॅग्ज, पर्शियन मांजरी यांचा समावेश होता.
ईडीने कोर्टासमोर दाखल केलेल्या दोषारोपपत्रात जॅकलिनचा आरोपी म्हणून समावेश करण्यात आला आहे. यंत्रणेचा दावा आहे की, सुकेशच्या कामांविषयी आणि त्याच्याकडे कोणत्या प्रकारे पैसे येत आहेत याची जॅकलिनला पूर्ण माहिती होती तरीही चैनीसाठी तिने त्याच्याकडून सर्व भेटवस्तू स्वीकारल्या.
मात्र, जॅकलिनच्या लीगल टीमने हे सर्व आरोप फेटाळले आहेत. तिचे वकील म्हणाले, जॅकलिन स्वत: या कटाची बळी ठरली आहे. सुकेशने एक बिझनेसमॅन असल्याचे सांगून जॅकलिनशी संपर्क साधला होता. त्यामुळे त्याचे चुकीचे काम अभिनेत्रीला माहीत नव्हते. हा संपूर्ण प्रकार बाहेर आल्यावरच तिला या गोष्टींची माहिती झाली, असा बचाव त्यांनी केला. अखेर न्यायालयाने दोन्ही पक्षांची बाजू ऐकून आरोपीवर ‘मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याच्या’ कलम ३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात यावा, असे निरीक्षण नोंदवले आहे.
















