27.6 C
Latur
Monday, May 27, 2024
Homeलातूर२१२५ मतदान केंद्रांवर ५७९४ शाईच्या बाटल्या 

२१२५ मतदान केंद्रांवर ५७९४ शाईच्या बाटल्या 

लातूर : प्रतिनिधी
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी ४१-लातूर लोकसभा मतदारसंघात दि. ७ मे रोजी मतदान होणार आहे. यासाठी निवडणुक आयोगाने मतदान केंद्रनिहाय लागणारे विविध साहित्य वाटपाचे नियोजन केले आहे. मतदानाच्या  दिवशी मतदारांच्या बोटाला लावण्यासाठी शाई ही ५ हजार ७९४ बाटल्या मागविण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर इतरही जवळपास १५० प्रकारचे साहित्य केंद्रनिहाय दिले जाणार आहे.
लातूर लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. केंद्रनिहाय कर्मचा-यांना प्रशिक्षण देण्यात आले असून आता मतदान केंद्रात कोणते साहित्य किती लागणार याची यादी निश्चित करुन साहित्यही मागविण्यात आले आहे. संबंधीत केंद्राध्यक्षांना बूथवर जाण्यापूर्वी हे साहित्य दिले जाते. जिल्हा निवडणुक निर्णय अधिकारी यांच्या मार्गदर्शनात आवश्यक ते सर्व साहित्य खरेदी करण्यात आले आहे.
मतदानाच्या दिवशी मतदारांच्या बोटाला लावण्यासाठी आवश्यक शाईच्या लातूर ग्रामीणला एक हजार बाटल्या, लातूर शहराला एक हजार ५८, अहमदपूरला १ हजार १०, उदगीरला ९३०, निलंगा ९५० तर लोह्याला ९०० बाटल्या शाई लागणार आहे. मतदान केंद्रावर शाईसोबतच अनेक प्रकारचे साहित्य लागतात. जवळपास १५० प्रकारचे साहित्य खरेदी करण्यात आले आहेत. मतदान केंद्राध्यक्षांना गरजेनूसार साहित्य दिले. त्यात २ हजार १२५ केंद्रांवर शाई पुरविली जाणार आहे. लागणारे साहित्य विधानसभा मतदारसंघनिहाय वाटप करण्यात आले असल्याचे निवडणुक विभागातून सांगण्यात आले. सहाही विधानसभा मतदारसंघात शाईसह इतर साहित्य निवडणुक अधिकारी कार्यालयातून पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे मतदान केंद्रात जाण्यापुर्वी कर्मचा-यांना हे सािहत्य दिले जाणार आहे. ग्रीन पेपर, टाचणी, रबर, मेनबत्त, पॅड आदी साहित्यांचा समावेश आहे.
लातूर लोकसभा मतदारसंघात १९ लाख ७७ हजार ५५ मतदार आहेत. त्यामध्ये महिला मतदारांची संख्या ९ लाख ३९ हजार ८९६ एवढी, पुरुष मतदार १० लाख ३३ हजार ७३०, सैनिक मतदार ३३६८, ८५ वर्षांपेक्षा अधिक वयाचे मतदार ३६६५८, दिव्यांग मतदार १७५५९, युवा मतदार ३६१७१, ट्रान्सजेंडर मतदार ६१ आहेत. लातूर लोकसभा मतदारसंघात एकुण २ हजार १२५ मतदान केंद्र आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR