मुंबई : राज्यातील शाळा बस मालकांनी बुधवारपासून अनिश्चित काळासाठी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. शालेय वाहतुकीसंदर्भातील अनेक समस्यांकडे शासनाचे व वाहतूक खात्याचे दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ शाळा ‘बस ऑनर्स असोसिएशन’ने हा निर्णय घेतला आहे. शासनाने जर आमच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही, तर २ जुलैपासून आम्ही संपूर्ण राज्यभर शाळा बस सेवा बंद ठेवू, अशी भूमिका त्यांनी घेतली.
आमच्या संघटनेची भूमिका सेवा थांबवण्याची नसली, तरी शाळा बस व्यवसायात निर्माण होणा-या अडचणींमुळे आम्हाला हा निर्णय घ्यावा लागत असल्याचे शाळा बस ऑनर्स असोसिएशनने काढलेल्या पत्रकात म्हटले आहे. ई-चलनाद्वारे होणारी कारवाई थांबवण्याची मागणी केली. शालेय वाहतूक सेवेसंदर्भातील सर्व शिफारशी शाळा बस सेवेवर लागू केल्याची स्पष्टता देणारे ई-चालान त्वरित रद्द करावेत. सर्व मान्यताप्राप्त शाळा बसचालकांना ओळखपत्र देण्यात यावे.
याशिवाय, शाळा बस वाहनांवरील नियमांचे पालन करणा-या वाहनांवर कोणताही अन्यायकारक दंड लादू नये. शासन, शाळा प्रशासन व शाळा बस संघटनांसह संयुक्त टास्क फोर्स स्थापन करावी. शाळेच्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी व शालेय वाहतुकीतील अडचणी सोडवण्यासाठी शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी संघटनेने केली आहे.