जळगाव : प्रतिनिधी
जळगावातील ‘लाडली दीदी’ उपक्रमानंतर सोमवार, २ सप्टेंबर रोजी कोल्हापूरच्या वारणानगरात राष्ट्रपतींच्या उपस्थितीत होणा-या महिला मेळाव्याला तब्बल अडीचशेहून अधिक बसेसची मागणी एसटी महामंडळाकडून सरकारने केली आहे. त्यामुळे कोकणात गणेशोत्सवासाठी गाड्या अपु-या पडणार असल्याचे म्हटले जात आहे.
दरम्यान, सरकारी उपक्रम असलेल्या एसटी महामंडळाला सरकार अर्थपुरवठा करून उभारी देत आहे. परंतु एसटीचे मुख्य काम जनतेची सेवा करण्याचे असताना आता सरकारी प्रचार यंत्रणेसाठी एसटीची बसेस वापरण्याची नवी प्रथा रूढ झाली आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या कोल्हापूरच्या वारणानगर येथे होणा-या उद्याच्या महिलांच्या मेळाव्यासाठी एसटी महामंडळाकडे तब्बल २२८ बसेसची मागणी सरकारने केलेली आहे. या बसेस ४४ आसनी आणि मोठ्या आकाराच्या असून या बसेस महिला मेळाव्याच्या कार्यक्रमासाठी पुरविण्यात येणार आहेत.
२ सप्टेंबरच्या माननीय राष्ट्रपतींच्या वारणानगरातील शिवनेरी क्रीडंगण येथे होणा-या कार्यक्रमास सुमारे ५० हजार महिला उपस्थित राहणार आहेत. यामुळे कोल्हापूर आणि सांगली आगारात प्रवाशांना गैरसोय होण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर, सांगली येथील प्रवाशांना सोमवारी एसटी बसेसविना राहावे लागणार आहे. त्यामुळे शाळेत जाणा-या मुलांसह अनेकांना आठवड्याच्या पहिल्या दिवशी खाजगी वाहतुकीवर विसंबावे लागणार आहे. आगारांनी स्वत:च्या ताफ्यातील बसेस वारणानगर आणि परिसरात पाठवायच्या आहेत. तसेच इचलकरंजी आणि मलकापूर आगारांच्या मदतीसाठी सांगली विभागाच्या ५० बसेस मागविल्या आहेत. त्यामुळे कोकणातील गणपती सणासाठीचे नियोजन बिघडणार आहे. कोकणात गाड्यांची गणेशोत्सवासाठी मोठी मागणी असल्याचे एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी म्हटले आहे.