23 C
Latur
Sunday, July 14, 2024
Homeराष्ट्रीय६ दहशतवाद्यांचा खात्मा

६ दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-काश्मिरात चकमक, २ जवान शहीद
श्रीनगर : वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये काल झालेल्या चकमकीत भारतीय लष्कराचे २ जवान शहीद झाले तर लष्कराने ६ दहशतवाद्यांचा खात्मा केला. यात दोन अतिरेक्यांचे मृतदेह शोधून काढण्यात आले. आता या भागात सुरक्षा जवानांनी शोध मोहीम सुरू केली आहे.

मोदरगाम आणि चिन्नीगाम या ग्रामीण भागात शनिवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू होती. या भागात शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. ज्यामध्ये एक जवान शहीद झाला होता तर दुसरीकडे सुरक्षा दलाने या चकमकीत कुलगाम जिल्ह्यात चार दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्यानंतर आणखी दोघांचे मृतदेह सापडले. त्यामुळे एकूण ६ दहशतवाद्यांचा या चकमकीत खात्मा झाला. मोदरगाम आणि चिन्नीगाम या परिसरात लष्कराचे दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यामुळे येथे सुरक्षा दलांनी शोधमोहीम सुरु केली. यावेळी झालेल्या चकमकीत दोन जवानांना प्राणांची आहुती द्यावी लागली.

या आधी २७ जून रोजी जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यातील गंडोह, भदरवाह सेक्टरमध्ये बुधवारी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ३ दहशतवादी ठार झाले होते. गेल्या महिन्यात ९ जूनच्या संध्याकाळी जम्मू आणि काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर यात्रेकरूंनी भरलेली बस खड्ड्यात पडली. त्यात ९ ठार आणि ३३ जण जखमी झाले.

अकोल्याचा जवान शहीद
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात शनिवारी झालेल्या चकमकीत अकोल्यातील एक जवान शहीद झाला. अकोला जिल्ह्यातील मोरगाव भाकरे गावातील प्रवीण जंजाळ हा तरुण दहशतवाद्यांशी लढताना शहीद झाला. प्रवीण जंजाळ शहीद झाल्याची माहिती मिळताच गावावर शोककळा पसरली. कुटुंबीयांसह पत्नी आणि आईने हंबरडा फोडला. २०१९ मध्ये प्रवीण जंजाळ भारतीय सैन्य दलात दाखल झाला होता. लग्नाला एकच वर्ष झाले. त्यामुळे पत्नीला मोठा धक्का बसला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR