मुंबई – दिग्गज अभिनेते आणि कॉमेडिअन असरानी यांनी आज अखेरचा श्वास घेतला. असरानी यांचं पूर्ण नाव गोवर्धन असरानी असं होते. मागील काही दिवसांपासून ते हॉस्पिटलमध्ये दाखल होते. मात्र २० ऑक्टोबरला संध्याकाळी ४ वाजता उपचारादरम्यान त्यांचे प्राण गेले. असरानी ८४ वर्षांचे होते.
फुफ्फुसांच्या समस्येमुळे गेल्या पाच दिवसांपासून असरानी यांना आरोग्य निधी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. असरानी यांचे मॅनेजर बाबूभाई थिबा यांनी असरानी यांच्या मृत्यूची पुष्टी केली. असरानी अनेक दिवसांपासून आजारी होते आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते असं त्यांनी सांगितले.
शोले या सिनेमातून असरानी यांनी केलेली जेलरची भूमिका अनेकांच्या आजही स्मरणात आहे. “हम अंग्रेजों के जमाने के जैलर हैं!” हे त्यांचे वाक्य प्रचंड गाजले. सुपरस्टार राजेश खन्ना यांच्यासोबत १९७२ ते १९९१ या काळात सुमारे २५ चित्रपटांमध्ये असरानी यांनी काम केले. भागम भाग, हेरा फेरी, छुपके छुपके यासारख्या सिनेमात त्यांनी विनोदी अभिनेत्याची भूमिका साकारली होती. ते सहजपणे मुख्य भूमिका, सहाय्यक भूमिका किंवा विनोदी भूमिका साकारत होते.