लंडन : वृत्तसंस्था
अंटार्क्टिकामधील बर्फ वितळण्याच्या प्रमाणाने आता (टिपिंग पॉइंट) संतुलन बिघडण्याचा बिंदू ओलांडला आहे. यामुळे संभाव्य विनाशकारी परिणामांसह कायमस्वरूपी बदल होऊ जात आहेत, असे नवीन संशोधनात नमूद करण्यात आले आहे. अंटार्क्टिका कदाचित परत न येण्याच्या हवामानातील टप्प्यावर पोहोचला असावा, असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे.२०१८ पासून समुद्रातील बर्फाची निर्मिती अचानक मोठ्या प्रमाणात घटली आहे.
‘न्यू सायंटिस्ट’ने दिलेल्या वृत्तानुसार, अनेक दशकांपासून जागतिक तापमान वाढत असतानाही अंटार्क्टिकामधील समुद्रातील बर्फाची पातळी तुलनेने स्थिर होती. मात्र, २०१६ मध्ये यात अचानक बदल झाला आणि समुद्रातील बर्फाचे प्रमाण झपाट्याने कमी होऊ लागले. फेब्रुवारी २०२३ मध्ये अंटार्क्टिकामधील समुद्रातील बर्फाने आतापर्यंतची सर्वात कमी पातळी गाठली. गेल्या सात वर्षांतील उन्हाळ्यातील बर्फाची ही तिसरी विक्रमी घट होती. तसेच, सप्टेंबर २०२३ मध्येही या समुद्रातील बर्फाची कमाल पातळी विक्रमी कमी नोंदवली गेली आहे.
जर्मनीतील अल्फ्रेड वेगेनर इन्स्टिट्यूटमधील अलेक्झांडर हॉमन यांच्या मते, बर्फ निर्मितीतील अचानक झालेल्या घसरणीत हवामानातील ‘टिपिंग पॉइंट’ची सर्व लक्षणे आहेत. हा बदल अचानक झाला आहे, तो संपूर्ण खंडावर परिणाम करत आहे आणि अंटार्क्टिकाच्या व्यापक हवामान तसेच पर्यावरणावर त्याचे मोठे परिणाम होतील. हॉमन यांनी ‘न्यू सायंटिस्ट’ला सांगितले की, संपूर्ण अंटार्क्टिक समुद्रातील बर्फ एका समग्र घटकाप्रमाणे प्रतिक्रिया देत आहे.
वातावरणातील ९०% उष्णता
महासागरांनी शोषली
नवीन संशोधनातून असे सूचित होते की, समुद्राच्या उष्ण होत असलेल्या पाण्यामुळे ही अचानक घट झाली आहे. मानवी गतिविधीमुळे वातावरणात अडकलेल्या अतिरिक्त उष्णतेपैकी सुमारे ९० टक्के उष्णता जगातील महासागरांनी शोषून घेतली आहे. उष्ण, खोल महासागरातील पाण्याचे प्रमाण पृष्ठभागावर जास्त वेगाने वाढत आहे, ज्यामुळे बर्फ कमालीच्या वेगाने वितळत आहे.
जागतिक समुद्र पातळी
५८ मीटरने वाढणार!
अंटार्क्टिक बर्फाच्या चादरीत इतके पाणी आहे की, ते जागतिक समुद्र पातळी ५८ मीटरने वाढवू शकते.अंटार्क्टिक समुद्रातील बर्फाचा नाश झाल्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागाची चमक कमी होईल, कारण पांढ-या बर्फापेक्षा गडद महासागराचे पाणी सूर्याची अधिक उष्णता शोषून घेते. यामुळे तापमान वाढ होईल.