शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी
राज्यातील लाखो शेतक-यांप्रमाणेच शिरूर अनंतपाळ तालुक्यातील शेतकरीही कर्जमाफी योजनेच्या लाभाच्या प्रतीक्षेत आहेत. सरकारकडून सुरुवातीला ३० जूनपर्यंत कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे संकेत देण्यात आले होते मात्र, अद्याप प्रत्यक्ष लाभ मिळालेला नसल्याने शेतक-यांमध्ये संभ्रम आणि प्रतीक्षेचे वातावरण आहे.
खरीप हंगामाला सुरुवात झाल्याने शेतक-यांवर बियाणे, खते, औषधे आणि मशागतीचा खर्च वाढला आहे. अशा परिस्थितीत कर्जमाफीचा लाभ वेळेत मिळाल्यास आर्थिक दिलासा मिळेल, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत. अनेक शेतक-यांचे पीककर्ज अद्याप थकीत असून नव्याने कर्ज घेण्यासाठीही अडचणी येत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. त्यामुळे कर्जमाफीची अंमलबजावणी लवकरात लवकर करून पात्र शेतक-यांच्या खात्यात लाभ जमा करावा, अशी मागणी शेतक-यांतून होत आहे.
सरकारकडून कर्जमाफीबाबत अंतिम प्रक्रिया पूर्ण होऊन लाभ वितरणाला गती मिळेल, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत असून, या निर्णयाकडे संपूर्ण कृषी क्षेत्राचे लक्ष लागले आहे. शेतीचे उत्पादन खर्च दिवसेंदिवस वाढत आहेत, तर नैसर्गिक आपत्ती आणि बाजारभावातील चढ-उतारामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत सरकारने पात्रतेच्या अटी न लावता सर्व शेतक-यांना सरसकट कर्जमाफी द्यावी. कर्जमाफीची घोषणा प्रत्यक्षात लवकरात लवकर अंमलात आणून शेतक-यांना दिलासा द्यावा. यामुळे शेतकरी नव्या जोमाने शेती करू शकेल आणि खरीप तसेच
आगामी हंगामासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल.
















