पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रकृतीबाबत मोठी माहिती समोर आली आहे. अजित पवार रविवारी नाशिक दौ-यावर गेले होते. त्यानंतर त्यांची अचानक प्रकृती खराब झाली. त्यामुळे त्यांनी नाशिक दौरा मध्येच सोडून नाशिकमधील सर्व कार्यक्रम रद्द केले. यानंतर ते ओझरवरून पुण्याला रवाना झाले.
आजही अजित पवारांच्या प्रकृतीत काहीच सुधारणा झाली नाही. त्यांना बरं वाटत नसल्याने त्यांनी आजचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहे. पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द करून अजित पवार सोमवारी सकाळी मुंबईला रवाना झाले आहेत.
रविवारी नाशिकमध्ये केलेल्या भाषणात अजित पवार यांनी आपली प्रकृती ठीक नसल्याचं सांगितलं होतं. आताच आपण दोन गोळ्या घेतल्या आहेत, तरीही मला बरं वाटत नाहीये. मी जास्त बोलणार नाही, असं अजित पवारांनी सांगितलं होतं. त्यानंतर त्यांनी नाशिकमधील सर्व कार्यक्रम रद्द करत पुण्याला आले होते. मात्र रात्री उपचार घेतल्यानंतरही त्यांना अजून बरं वाटत नाहीये. त्यामुळे त्यांनी आजचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. यानंतर ते मुंबईला रवाना झाले आहे. मुंबईतल्या निवासस्थानी ते आराम करू शकतात.
खरं तर, अलीकडेच शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षिरसागर यांनी पुण्यातील जुन्नर येथे अजित पवार यांची भेट घेतली होती. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ बंददाराआड चर्चा झाली होती. या चर्चेनंतर शरद पवार गट फुटणार असल्याचा अंदाज लावण्यात येऊ लागला. मात्र दोन्ही नेत्यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. बीडमध्ये सध्या २१ दिवसानंतर पाणी सोडलं जातं. बीडमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. यावर तोडगा काढण्यासाठीच क्षिरसागरांनी अजित पवारांची भेट घेतली होती. या घडामोडीनंतर आता अजित पवारांची तब्येत खराब झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. त्यामुळे अजित पवारांच्या आजाराला आता संदीप क्षिरसागर यांच्या भेटीशी देखील जोडलं जातंय.