२४ तासांत माहिती देणे बंधनकारक, शासनादेश जारी
मुंबई : प्रतिनिधी
बदलापूरच्या शाळेतील बाल लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर राज्य सरकार खडबडून जागे झाले असून शाळा स्तरावर कडक नियमावली बनवण्यात येत आहे. शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंदर्भात काही महत्त्वाचे निर्णय घेतले असून, विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या सुरक्षाविषयक उपाययोजनांच्या काटेकोर अंमलबजावणीबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. त्यानुसार शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे शाळेत लैंगिक अत्याचाराची घटना घडल्यास २४ तासांत शिक्षणाधिकारी यांना याबाबतची माहिती द्यावी लागणार आहे.
शाळा व परिसरात विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरा हा उत्तम पर्याय आहे. खासगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांकरिता या शासन निर्णयाच्या दिनांकापासून एक महिना कालावधीत शाळा व परिसरातील मोक्याच्या ठिकाणी पर्याप्त संख्येने सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे बंधनकारक राहील. या तरतुदीचे पालन न करणा-या शाळांच्या संदर्भात योग्य ती कारवाई करण्यात येईल. त्यामध्ये प्रसंगपरत्वे शाळेचे अनुदान रोखणे अथवा शाळेची मान्यता रद्द करणे यासारख्या मार्गाचा देखील अवलंब करण्यात येईल. शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले नाहीत, अशा शाळांनी प्राधान्याने कॅमेरे बसविण्याबाबत कार्यवाही करावी.
कॅमे-यासाठी निधी राखीव
शासन निर्णयान्वये जिल्हा वार्षिक (सर्वसाधारण) योजना अंतर्गत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाशी संबंधित योजनांची पुनर्रचना करून सीसीटीव्ही कॅमे-यासाठी किमान ५ टक्के निधी राखीव ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे. सदर शासन निर्णयान्वये ज्या योजनांसाठी हा निधी वापरण्यास मुभा आहे, त्याचा प्राधान्यक्रम निश्चित करण्यात आला आहे.