मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघांसाठी बुधवारी (२० नोव्हेंबर) एकाच टप्प्यात मतदान पार पडले. मतदानानंतर बहुतांश एक्झिट पोलनी विधानसभा निवडणुकीत राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन होण्याची शक्यता वर्तवली आहे. मात्र, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एक्झिट पोलचे आकडे आणि शक्यता फेटाळल्या आहेत. सोबतच अपक्ष उमेदवारांना ५० ते १०० कोटींची ऑफर महायुतीकडून मिळत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
यासंदर्भात मुंबईत माध्यमांशी संवाद साधत असताना संजय राऊत म्हणाले, प्रत्येक मतदारसंघाचा आढावा घेतल्यानंतर आमच्या असे लक्षात आले की, आम्ही किमान १६० जागा जिंकू. त्यामुळे जे सर्व्हे येतायत, त्या सर्व्हेंची ऐसी की तैसी! सत्ता असलेल्या ठिकाणी इतर छोटे-मोठे पक्ष एकत्र येतात.
यासाठी शेतकरी पक्ष, समाजवादी पक्ष, डाव्या विचारसरणीचे पक्ष, हे सर्व छोटे पक्ष आमच्यासोबत आहेत. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जिंकण्याची खात्री नसल्याने त्यांनी उमेदवारांना ५० ते १०० कोटी रुपयांची ऑफर द्यायला सुरुवात केली आहे, असा आरोपही संजय राऊत यांनी केला.