25.1 C
Latur
Thursday, December 26, 2024
Homeराष्ट्रीयअपप्रचार करणा-या महायुतीच्या नेत्यांनी माफी मागावी

अपप्रचार करणा-या महायुतीच्या नेत्यांनी माफी मागावी

१.२२ कोटी महिलांना मिळतात दरमहा २ हजार रुपये, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार
बंगळुरू : प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु झालेली असतानाच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी मराठीत एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करुन महाराष्ट्रातील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना आव्हान दिले आहे. तिन्ही पक्षांच्या नेत्यांना कर्नाटकमधील काँग्रेस सरकारने राबवलेल्या योजनांबद्दल संशय असल्यास विशेष विमानाची आणि बसेसची व्यवस्था करुन देऊ, कर्नाटकात येऊन आमच्या लोकांसोबत संवाद साधून सत्य जाणून घ्या, असे डीके शिवकुमार म्हणाले. कर्नाटकातील १.२२ कोटी महिलांना महालक्ष्मी योजनेचे दरमहा २ हजार रुपये मिळतात, असे ते म्हणाले.

भाजप, शिवेसना आणि महायुतीच्या नेत्यांनी जनतेची माफी न मागितल्यास कायदेशीर कारवाईचा विचार करावा लागेल, असा इशारा देखील डीके शिवकुमार यांनी दिला. भाजपकडून एका मराठी वृत्तपत्रात प्रकाशित करण्यात आलेल्या एका जाहिरातीत कर्नाटक, तेलंगाणा आणि हिमाचल प्रदेशच्या योजनांबाबत उल्लेख करण्यात आला होता. त्यानंतर आता डीके शिवकुमार यांनी मराठीत ट्वीट करत इशारा दिला आहे.

कर्नाटक हे संपूर्ण देशासाठी एक आदर्श राज्य आहे, कारण इथे केंद्र सरकारच्या महागाईमुळे त्रासलेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी आम्ही खात्रीशीर योजना राबवल्या आहेत. महाराष्ट्रातील भाजप आणि त्यांच्या सहका-यांनी जनतेची फसवणूक करत, आमच्या हमी असलेल्या योजनांची नक्कल करण्यापर्यंत ते गेले आहेत. ही बसवण्णांची भूमी आहे, आम्ही आमच्या जनतेला दिलेले वचन पाळले आहे. याबाबत कोणालाही शंका असेल, तर मी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांसाठी विशेष विमान किंवा बसेसची व्यवस्था करीन, जेणेकरून ते कर्नाटकात येऊन आमच्या लोकांशी संवाद साधू शकतील आणि सत्य जाणून घेऊ शकतील!

१.२२ कोटी महिलांना लाभ
आमच्या १.२२ कोटी महिलांना ‘गृहलक्ष्मी’ योजनेतून दरमहा २ हजार रुपये मिळत आहेत. १.६४ कोटी कुटुंब ‘गृहज्योती’ योजनेचा लाभ घेत आहेत. ४.०८ कोटी लोकांना ‘अन्नभाग्य’ योजनेअंतर्गत मोफत तांदूळ दिले जात आहेत. ‘शक्ती’ योजनेद्वारे ६२० कोटी महिलांनी मोफत प्रवास केला. ‘युवा निधी’ योजनेद्वारे ५ लाख विद्यार्थ्यांना महिन्याला ३ हजार रुपये मिळत आहेत. दिशाभूल करणा-या माहितीमुळे जनतेची फसवणूक करणा-या भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जनतेची माफी मागावी, अशी माझी मागणी आहे अन्यथा आम्हाला कायदेशीर कारवाईचा विचार करावा लागेल, असा इशाराही डी. के. शिवकुमार यांनी दिला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR