क्वेटामध्ये पाठविल्या तब्बल २०० शवपेट्या
अद्याप १०० प्रवासी दहशतवाद्यांच्या तावडीत
इस्लामाबाद : वृत्तसंस्था
पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतात काल एक्स्प्रेस ट्रेनचे अपहरण झाले. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीच्या बंडखोरांनी जाफर एक्स्प्रेस हायजॅक केली. यामध्ये मोठ्या प्रमाणात नरसंहार झाल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. कारण पाकिस्तान सरकारने बलुचिस्तानची राजधानीत २०० हून अधिक शवपेट्या पाठवल्या आहेत. दरम्यान, ओलिस ठेवलेल्या प्रवाशांची सुटका करण्यात अद्याप पाकिस्ताली लष्कराला यश आलेले नाही. त्यामुळे चिंता वाढली आहे.
बलुचिस्तानातील बोलनला पाठवण्यासाठी २०० पेक्षा अधिक शवपेट्या क्वेटाला आणण्यात आल्याच्या वृत्ताला पाकिस्तानी रेल्वे अधिका-यांनी दुजोरा दिला. ट्रेनच्या अपहरणाला एक दिवस होऊन गेला. परंतु पाक लष्कराला अद्याप तरी सगळ््या ओलिसांची सुटका करता आलेली नाही. ओलिसांमध्ये सैनिकांची, सीक्रेट एजंट्सची संख्या मोठी आहे. तसेच सरकारी कर्मचारी आहेत. पाकिस्तानी लष्करानं १५५ प्रवाशांची सुटका केल्याचा दावा पाकिस्तानी माध्यमांनी केला आहे. अपहृत प्रवाशांची सुटका करताना बलुच लिबरेशन आर्मीचे २७ जण मारले गेले. आताही जाफर एक्स्प्रेसमध्ये १०० पेक्षा अधिक प्रवासी बंदूकधा-यांच्या तावडीत आहेत. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने लष्कराचे ३० सैनिक टिपले आहेत.
ओलिसांसोबत
आत्मघाती हल्लेखोर
बीएलएने ओलिसांमध्ये त्यांचे आत्मघाती हल्लेखोर बसवून ठेवले आहेत. त्यांनी आत्मघाती हल्ल्यांसाठी स्फोटके असलेले जॅकेट परिधान केले आहे. त्यामुळे ओलिसांची सुटका करताना सुरक्षा दलांना अडचण येत आहे. ज्या भागात रेल्वेवर हल्ला झाला, तो डोंगराळ आणि दुर्गम असल्याने तिथे पोहोचणे लष्करासाठी जिकिरीचे आहे.