७१ व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ््यात मंगळवारी गौरविणार
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
मल्याळम चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार मोहनलाल यांना प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्कार २०२३ ने सन्मानित केले जाणार आहे. चित्रपटसृष्टीतील आजवरच्या योगदानासाठी मोहनलाल यांना हा पुरस्कार जाहीर झाला. प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्कार मिळविणारे मोहनलाल हे दुसरे मल्याळी कलाकार आहेत. त्यांच्याआधी अदूर गोपालकृष्णन यांना २००४ साली हा पुरस्कार मिळाला होता. या पुरस्कारासाठी निवड होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले. भारतीय चित्रपटसृष्टीतील हा सर्वोच्च पुरस्कार मानला जातो.
मोहनलाल यांच्या आधी ज्येष्ठ बॉलिवूड आणि बंगाली अभिनेते मिथून चक्रवर्ती यांना हा पुरस्कार मिळाला होता. २०२२ च्या दादासाहेब फाळके पुरस्काराने मिथून यांना सन्मानित करण्यात आले. ६५ वर्षीय मोहनलाल हे गेल्या ४५ वर्षांपासून मल्याळम चित्रपटसृष्टीत काम करीत आहेत. १९८० साली त्यांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण केले होते. ४५ वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीत त्यांनी ४०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. भारतीय चित्रपट सृष्टीतील योगदानासाठी त्यांना या आधी पद्मश्री, पद्मभूषण पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. मोहनलाल यांना येत्या २३ सप्टेंबर २०२५ रोजी होणा-या ७१ व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ््यात दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
पंतप्रधानांनी
दिल्या शुभेच्छा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सोशल मीडिया एक्स हँडलवर पोस्ट करीत अभिनेते मोहनलाल यांना या पुरस्काराबद्दल शुभेच्छा दिल्या. मोहनलाल हे उत्कृष्ठता आणि बहुमुखी प्रतिभेचे प्रतीक आहेत. त्यांनी तेलुगु, तमिळ, कन्नड आणि हिंदीतही प्रभावी अभिनयाची कमाल दाखविली आहे, अशा शब्दांत गौरव केला.