अमरावती : प्रतिनिधी
अमरावती जिल्हा स्त्री सामान्य रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता विभागाला सोमवारी पहाटे साडेतीन वाजता भीषण आग लागली. या आगीत एकूण तीन नवजात बाळ दगावल्याची दुर्दैवी घटना घडली.
जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता विभागात सोमवारी पहाटे साडेतीन वाजता भीषण आग लागली. यावेळी नवजात शिशु अतिदक्षता विभागात कार्यरत असणा-या महिला कर्मचा-यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ही आग इतकी भीषण होती की अवघ्या काही वेळात रौद्ररूप धारण केले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांनी जिल्हा स्त्री सामान्य रुग्णालयात धाव घेतली. यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.
या घटनेवेळी नवजात शिशु अतिदक्षता विभागात एकूण नऊ बालक दाखल होतो. या भीषण घटनेत तीन बालक दगावले, तर सहा बाळांना कर्मचा-यांनी अतिदक्षता विभागातून तातडीने बाहेर काढले. या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, सोमवारी पहाटे साडेतीन वाजता नवजात शिशु अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरमध्ये अचानक स्फोट झाला. त्यामुळे लागलेली आग अतिदक्षता विभागात वेगाने पसरली. मात्र, रुग्णालयातील कर्मचा-यांनी या कक्षातील बालकांना वेगाने बाहेर काढले.
अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या तिस-या मजल्यावर एकूण तीन नवजात शिशु अतिदक्षता कक्ष आहेत. या तीन कक्षांमध्ये प्रत्येकी १३ अशी मिळून ३९ नवजात बालकांवर उपचार घेण्याची क्षमता आहे. यापैकी एका कक्षात आग लागली. आग लागल्याचे लक्षात येताच ड्युटीवर असलेल्या डॉक्टर आणि नर्सेस, कर्मचा-यांनी या कक्षातील लहान बाळांना बाहेर काढले. मात्र, यात तीन बालकांचा मृत्यू झाला. सोमवारी मध्यरात्री ३.३० च्या सुमारास व्हेंटिलेटरचा स्फोट होऊन आग भडकली. ठकउव कक्ष या आगीत जळून खाक झाला. अमरावतीचे पोलिस आयुक्त राकेश ओला यांनी देखील घटनास्थळाची पाहणी केली. या आगीमागचं नेमकं कारण काय? याची चौकशी केली जाईल, असे पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केले.
















