मुंबई : प्रतिनिधी
सध्या साखर, गूळ आणि गोडेतेल यांच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून त्यापाठोपाठ कांदा, लसूण आणि अद्रकाच्या दरात अचानक मोठी वाढ झाली असून, कांदा आठवडाभरात ४० रुपयांवरून थेट ६० रुपये किलोवर पोहोचला आहे. लसणाचा दर ३०० रुपये, तर अद्रक २०० रुपये किलोवर आहे. ग्राहकांच्या बजेटला या दरवाढीचा फटका बसत आहे.
गेल्या आठवड्यात सुमारे ४० रुपये किलो असलेला कांदा आता ६० रुपये किलोवर पोहोचला आहे. म्हणजेच किरकोळ बाजारात किलोमागे तब्बल २० रुपयांची वाढ झाली आहे. मात्र, शेतातून बाजारपेठेपर्यंतच्या साखळीत उत्पादकाला मिळणारा दर आणि ग्राहकाकडून मोजला जाणारा किरकोळ दर यामध्ये मोठी तफावत असण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरवाढीचा खरा लाभ कांदा उत्पादकांच्या पदरात पडतो का, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
उत्पादन घटल्याने कांद्याला आधार
गेल्या पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीचा कांदा उत्पादनाला मोठा फटका बसला. काढणीला आलेला कांदा सततच्या पावसामुळे सडल्याने उत्पादकांचे नुकसान झाले. खराब हवामानामुळे उत्पादन आणि गुणवत्तेवर परिणाम झाला. याशिवाय, मागील काही वर्षांत कांद्याला अपेक्षित दर न मिळाल्याने अनेक शेतक-यांनी लागवड क्षेत्र कमी केले. परिणामी यवतमाळ जिल्ह्यात कांद्याची लागवड तुलनेने नगण्य राहिली आहे. स्थानिक उत्पादन कमी असल्याने बाजारपेठेला बाहेरील आवकेवर अवलंबून राहावे लागत आहे.
लागवड घटल्याचा परिणाम आता जाणवतोय
कांद्याला सातत्याने चांगला भाव मिळत नसल्यास शेतकरी पुढील हंगामात लागवड कमी करतात. त्याचा परिणाम काही महिन्यांनंतर बाजारातील आवकेवर दिसतो. सध्याची दरवाढ ही त्याच चक्राचा एक भाग मानली जाऊ शकते. दर कमी झाल्याने शेतक-यांचे नुकसान झाले आहे. सध्या लागवड घटत असल्याने उत्पादन कमी होत आहे. बाजारातील आवक घटताना दिसत असल्याने दरवाढ होताना दिसते, असे हे चक्र आहे. त्यामुळे कांद्याला स्थिर आणि उत्पादन खर्चाच्या तुलनेत किफायतशीर दर मिळणे शेतक-यांसाठी आवश्यक आहे.
लसूण, अद्रकातही शेतक-यांना संधी
कांद्याबरोबरच लसूण आणि अद्रकाच्या दरातही वाढ झाली आहे. सध्या लहान गाठीचा लसूण सुमारे २०० रुपये किलो, तर मोठ्या गाठीचा लसूण ३०० रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. अद्रकाचा दरही १५० रुपयांवरून २०० रुपये किलो झाला आहे. या दरवाढीमुळे ग्राहकांच्या अडचणी वाढल्या असल्या तरी उत्पादकांसाठी बाजारातील मागणी आणि दराचा कल सकारात्मक राहिल्यास उत्पन्न वाढविण्याची संधी निर्माण होऊ शकते.
















