अमरावती : प्रतिनिधी
अमरावतीतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील वलगाव येथे रविवारी दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण परिसर हादरून गेला. वलगाव बसस्टँड परिसरात दोन तरुणांची अज्ञात व्यक्तींनी निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत संजोग जोशी (वय २४) आणि ऋतिक पंडित (वय २५) या दोन तरुणांचा मृत्यू झाला असून, हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रविवारी रात्री उशिरा बसस्टँड परिसरात काही संशयास्पद हालचाली दिसून आल्या होत्या. त्यानंतर परिसरातील नागरिकांना दोन तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळून आले. घटनेची माहिती तात्काळ वलगाव पोलिसांना देण्यात आली.
माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि परिसराची पाहणी करत पंचनामा सुरू केला. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून, हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पोलिसांनी पुरावे गोळा करून पुढील तपास सुरु केला आहे. या दुहेरी हत्याकांडामुळे वलगावसह संपूर्ण अमरावती जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी होत आहे.
















