अर्जेंटिनाचा पराभव, मेस्सीचा स्वप्नभंग
न्यूयॉर्क : वृत्तसंस्था
फिफा वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेतील न्यूयॉर्क न्यू जर्सी स्टेडियमवरील रोमहर्षक अंतिम सामन्यात स्पेनच्या संघाने मेस्सीच्या नेतृत्वाखालील गत चॅम्पियन अर्जेंटिनाला १-० असे पराभूत करीत दुस-यांदा जगज्जेतेपद पटकावले. स्पेनच्या संघाने एकीचे बळ दाखवत सामन्याच्या सुरुवातीपासून सर्वोत्तम खेळ करीत मेस्सी आणि अर्जेंटिनापेक्षा सरस कामगिरी बजावून विजयश्री खेचून आणली. या सामन्यात अर्जेंटिनाला धक्का देत स्पेनने इटलीचा विश्वविक्रम मोडला.
फेरान टोरेसने नोंदवलेल्या गोलच्या जोरावर स्पेनने फुटबॉल वर्ल्ड कप २०२६ च्या अंतिम लढतीत गतविजेत्या अर्जेंटिनाला १-० असे हरवले. यासह स्पेनने पुन्हा एकदा युरो कपपाठोपाठ वर्ल्ड कप उंचावण्याची कामगिरी केली. यापूर्वी त्यांनी २००८ मध्ये युरो कप जिंकला होता. त्यापाठोपाठ २०१० मध्ये वर्ल्ड कप उंचावला. त्यानंतर त्यांनी २०२४ मध्ये युरो कप जिंकला होता, त्यापाठोपाठ आता वर्ल्ड कपही उंचावला. जागतिक क्रमवारीत अर्जेंटिना पहिल्या तर स्पेन दुस-या क्रमांकावर आहे.
यापूर्वी हे संघ आतापर्यंत चौदा वेळा आमनेसामने आले. त्यात दोन्ही संघांनी प्रत्येकी ६ लढती जिंकल्या तर दोन लढती ‘ड्रॉ’ झाल्या. स्पेनने सातत्याने आक्रमक चाली रचल्या. स्पेनच्या यमाल, अॅलेक्स बाएना, फेरान टोरेस, पेड्री यांनी कसोशीने प्रयत्न केले. मात्र, अर्जेंटिनाचा गोलरक्षक एमिलियानो मार्टिनेझने अप्रतिमरित्या त्यांचे प्रयत्न हाणून पाडले. मात्र, अखेर अतिरिक्त वेळेतीतल ब्रेकनंतर पुढच्याच मिनिटाला निको विल्यम्सच्या पासवर फेरान टोरेसने (१०६ मि.) जबरदस्त गोल नोंदवला आणि स्पेनच्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला. यासह मेस्सीचे सलग दुस-यांदा वर्ल्ड कप उंचावण्याचे स्वप्न भंगले.
एम्बापे गोल्डन बूटचा मानकरी
फ्रान्सचा किलियन एम्बापे सलग दुस-यांदा ‘गोल्डन बूट’चा मानकरी ठरला. त्याने यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये १० गोल नोंदवले. तसेच चार गोलमध्ये त्याने सा केले. लिओनेल मेस्सी आणि एम्बापे यांच्यात ‘गोल्डन बूट’साठी चुरस होती. दोघांचे ८ गोल झाले होते. मात्र, इंग्लंडविरुद्धच्या लढतीत एम्बापेने २ गोल नोंदवले आणि त्याने बाजी मारली. गेल्या वर्ल्ड कपमध्ये एम्बापेने ८ गोल नोंदवून हा मान मिळवला होता.
अर्जेंटिनाला मिळाले
चौथ्यांदा उपविजेतेपद
स्पेनने दुस-यांदा वर्ल्ड कप उंचावला. यापूर्वी स्पेनने २०१० मध्ये ही स्पर्धा जिंकली होती तर अर्जेंटिनाला चौथ्यांदा (१९३०, १९९०, २०१४, २०२६) उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
इटलीचा विक्रम मोडित
फिफा वर्ल्डकप २०२६ च्या स्पर्धेतील हा स्पेनचा सलग ३८ वा विजय ठरला. स्पेनने २०२४ पासून आतापर्यंत खेळलेले सर्व सामने जिंकले आहेत. यापूर्वी सलग सामने जिंकण्याचा विक्रम इटलीच्या नावावर होता. इटलीने २०१८ ते २०२१ या कालावधीत ३७ सामने सलग जिंकले होते.
















