छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने भारतीय जनता पक्षाने मायक्रो प्लॅनिंगसाठी विभागवार बैठका सुरू केल्या आहेत. मात्र महायुतीची चर्चा अजूनही जागावाटपावरच अडून बसली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत संभाजीनगरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बुधवारी मध्यरात्रीपर्यंत खलबतं सुरू असल्याची माहिती आहे.
राज्यातील २८८ मतदारसंघांबाबत या बैठकीत चर्चा झाली. या बैठकीतील तपशील काही समोर आला नाही. मात्र जागा वाटपाबद्दल सामंजस्याने चर्चा सुरू असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री दीडच्या सुमारास विमानतळावर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
महायुतीमध्ये सर्वाधिक जागांची मागणी भाजपकडून होत आहे. भाजपने १५५-१६० जागा लढाव्यात आणि उर्वरित जागांमध्ये शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गटाने लढावे असे भाजप नेत्यांचे मत आहे. तर महायुतीतील मित्र पक्षांना तिन्ही प्रमुख पक्षांनी आपापल्या जागांमधूनच तिकिट देण्याचेही सूत्र ठरले असल्याचे म्हटले जाते.
अजित पवार यांच्या महायुतीतील प्रवेशापासून भाजपचे कार्यकर्ते नाराज असल्याची चर्चा आहे. महायुतीची सत्ता आल्यानंतर सत्तेतील अधिकाधिक वाटा मिळवायचा असेल तर जागाही जास्त जिंकून आल्या पाहिजेत, हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना माहीत आहे. त्यामुळे ते बार्गेनिंग पॉवर वाढवत आहेत. त्यांनी नेमकी किती जागांची मागणी केली हे समोर आले नाही. मात्र ६० ते ७० जागांची मागणी अजित पवार गट करत असल्याची चर्चा आहे. बैठकीतून सर्वांत आधी अजित पवार हेच बाहेर पडले होते.
भाजपने १५०-१५५ जागा लढल्या तर साधारण १३०जागा शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या वाट्याला येतात. त्यामुळे या दोन्ही पक्षांना किती जागा द्यायच्या यावरून मोठा खल झाल्याचे समजते. सध्याच्या विधानसभेत शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ९४ आमदार आहेत. त्यामुळे १३० ते १३३ जागांपैकी ३९-४० जागांबद्दलच निर्णय घेणे बाकी आहे. महायुतीमध्ये अजित दादांच्या राष्ट्रवादीला किती जागा सोडायच्या यावरच सर्वाधिक चर्चा सुरू आहे. शिवसेना शिंदे गटाला मुंबई, मराठवाडा आणि कोकणात सर्वाधिक जागा हव्या आहेत. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून पुणे, पश्चिम महाराष्ट्रातून अधिकच्या जागांची मागणी होत आहे. निवडून येण्याची ताकद असलेल्या उमेदवारांची निवड करून लोकसभेत ज्या उणिवा राहिल्या त्यावर तोडगा काढण्याचेही या बैठकीत ठरल्याचे समजते.