नवी दिल्ली : वृत्तसंस्था
अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ४०० पारचा नारा दिलेल्या भाजपला प्रत्यक्षात मात्र २४० जागांवर समाधान मानावे लागले. एनडीएमधील घटक पक्षांच्या पाठिंब्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला तिसरा कार्यकाळ सुरू केला. गेल्या अनेक काळापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उत्तराधिकारी कोण असेल, याबाबत अनेक चर्चा सुरू आहेत. एका सर्व्हेत याबाबत अंदाज घेण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उत्तराधिकारी म्हणून अमित शाह, योगी आदित्यनाथ आणि नितीन गडकरी यांची नावे आघाडीवर आहेत. ‘इंडिया टुडे’ने केलेल्या सर्वेक्षणात २५ टक्के लोकांनी नरेंद्र मोदी यांच्यानंतर अमित शाह यांना पंतप्रधानपदी पसंती दिली. यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि त्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नावांना पसंतीक्रम देण्यात आला.
पंतप्रधानपदासाठी योगी आदित्यनाथ यांना १९ टक्के मते मिळाली आहेत. तर नितीन गडकरी यांना १३ टक्के मते मिळाली आहेत. याशिवाय संरक्षणमंत्री राजनाथ स्ािंह, केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांना ५ टक्के मते मिळाली आहेत. इंडिया टुडेने केलेल्या सर्व्हेत अमित शाह यांचे नाव आघाडीवर असले तरी ऑगस्ट २०२३ आणि फेब्रुवारी २०२४ मध्ये झालेल्या सर्व्हेंच्या तुलनेत कमी रेटिंग मिळाल्याचे सांगितले जात आहे. या सर्व्हेंमध्ये अमित शाह यांना २८ आणि २९ टक्के मते मिळाली होती. इतकेच नाही तर दक्षिण भारतातील जनतेने अमित शाह यांच्या नावाला प्राधान्यक्रम दिला होता. त्यांना ३१ टक्के जनतेचे समर्थन मिळाले होते.
योगींना पसंती घटली : गेल्या दोन सर्व्हेंच्या तुलनेत संरक्षण मंत्री असलेल्या राजनाथ सिंह यांना जनतेचे समर्थन वाढल्याचे पाहायला मिळाले आहे. तर योगी आदित्यनाथ यांची पसंती घटल्याचे दिसत आहे. ऑगस्ट २०२३ मध्ये २५ टक्के तर फेब्रुवारी २०२४ मध्ये २४ टक्के जनतेने योगी आदित्यनाथ यांना समर्थन दर्शवले होते. ऑगस्ट २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या सर्व्हेत १.२ टक्क्यांनी राजनाथ स्ािंह यांची लोकप्रियता वाढली. तर शिवराज स्ािंह चौहान यांच्या लोकप्रियतेत ५.४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मूड ऑफ द नेशन सर्व्हे १५ जुलै ते १० ऑगस्ट २०२४ या दरम्यान घेण्यात आला होता.