इटानगर : एकीकडे लोकसभेत ‘४०० पार’चा नारा देणा-या भाजपने अरूणाचल विधानसभेत धडाकेबाज सुरूवात केली आहे. मुख्यमंत्री पेमा खांडू, उपमुख्यमंत्री चाऊना मिना यांच्यासह एकूण पाच उमेदवारांची विधानसभेसाठी बिनविरोध निवड झाल्याची माहिती समोर येत आहे. अरूणाचल प्रदेशमध्ये १९ एप्रिल रोजी विधानसभेच्या ६० जागांसाठी मतदान होणार असून अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस संपला आहे.
अरूणाचल प्रदेशमध्ये येत्या १९ एप्रिल रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्यासाठी बुधवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. एकूण ६० जागा असणा-या विधानसभेमधील पाच ठिकाणी केवळ एकच अर्ज आल्याने त्या जागा बिनविरोध निवडून आल्याचे स्पष्ट झाले. या सर्व पाचही जागा भाजपच्या आहेत. त्यामध्ये मुख्यमंत्री पेमा खांडू आणि उपमुख्यमंत्री चाऊना मिना यांचा समावेश आहे. त्याचसोबत राटू टेकी, जिक्की टाको, न्यातो दुकोम आणि मुटकू मिथी यांचा समावेश आहे.
अरुणाचल प्रदेशमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी एकत्रित मतदान होणार असून त्याचा निकाल २ जून रोजी लागणार आहे. अरुणाचल प्रदेश विधानसभेच्या एकूण जागांची संख्या ६० आहे. २०१९ च्या निवडणुकीत एनडीएला ४१ जागांवर विजय मिळाला होता.