26.4 C
Latur
Saturday, December 28, 2024
Homeसंपादकीय‘अर्थदीप’ विझला!

‘अर्थदीप’ विझला!

अर्थकारण आणि राजकारण यांचा सुंदर मिलाफ घडवत देशाला आर्थिक संकटाच्या खाईतून बाहेर काढणारे जागतिक कीर्तीचे अर्थतज्ज्ञ, भारतातील आर्थिक सुधारणांचे नायक, राजकीय क्षेत्रात राहूनही राजकारणी नसलेले अजातशत्रू, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी (२६ डिसेंबर)रात्री दिल्लीच्या एम्स रुग्णालयात श्वसनाच्या आजाराने निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन कन्या असा परिवार आहे. १९९१ मध्ये संकटात सापडलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला बाहेर काढून देशाला उदारीकरणाची दिशा देणारे माजी पंतप्रधान, शिक्षणतज्ज्ञ, आंतरराष्ट्रीय अर्थतज्ज्ञ, नोकरशहा, राजकारणी अशा सर्वच क्षेत्रांत त्यांनी आपला ठसा उमटवला. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, केंद्रीय अर्थमंत्री, पंतप्रधान आदी विविध पदे त्यांनी भूषविली आणि आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. त्यांच्या निधनाने देशभर शोककळा पसरली आहे.

त्यांच्यावर शासकीय इतमामात अन्त्यसंस्कार करण्यात येणार असून सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची प्रकृती गुरुवारी खालावल्यानंतर रात्री साडेसातच्या सुमारास त्यांना दिल्ली येथील एम्स रुग्णालयाच्या आपत्कालीन कक्षात दाखल करण्यात आले. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर अखेर ९.५१ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. १९९१ मध्ये भारताची अर्थव्यवस्थेतील वित्तीय तूट ८.५ टक्क्यांवर पोहोचली होती. चालू खात्यातील तूट भारतीय विकास दराच्या ३.५ टक्क्यांवर गेली होती. तसेच भारताकडे केवळ १ अब्ज डॉलरचा परकीय चलनसाठा शिल्लक होता. हा साठा केवळ दोन आठवडे पुरेल इतकाच होता.

देश मोठ्या आर्थिक संकटात सापडला होता. भारत सरकारने जागतिक नाणेनिधीकडे मदत मागितली तेव्हा जागतिक नाणेनिधीने अनेक अटी घातल्या. त्यात परवानाराज पद्धत रद्द करणे, सरकार नियंत्रित अर्थव्यवस्था खुली करणे आदी अटींचा समावेश होता. अर्थमंत्री सिंग यांनी तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव व काँग्रेस पक्षाला देशावरील गंभीर परिस्थितीची जाणीव करून दिली. अर्थव्यवस्था खुली न केल्यास व्यवस्था कोसळून पडेल असे स्पष्ट केले. तेव्हा पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांनी भारतीय अर्थव्यवस्था खुली करण्याची परवानगी अर्थमंत्री सिंग यांना दिली. अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी अर्थव्यवस्थेत मूलगामी बदल केले. पाच वर्षांच्या अर्थमंत्रिपदाच्या कार्यकालात त्यांनी भारताला आर्थिक संकटातून बाहेर काढले. देशात उदारीकरणाचे पर्व सुरू झाले. डॉ. सिंग यांनी देशाचे अर्थमंत्री म्हणून सूत्रे हाती घेतली, त्यावेळी देशाची आर्थिक स्थिती ढासळलेली होती. परंतु सिंग यांनी मुक्त आर्थिक धोरणाचा स्वीकार करून जगाला भारताची अर्थव्यवस्था खुली केली. देशात उदारमतवादाचे वारे वाहू लागले. अर्थव्यवस्थेची गाडीही रुळावर आली. भारताच्या अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचा पाया त्यांनी घातला. डॉ. सिंग १९९१ पासून राज्यसभेचे सदस्य राहिले.

राज्यसभेत ते १९९८ ते २००४ पर्यंत विरोधी पक्षनेते होते. २००४ आणि २००९ मध्ये काँग्रेस पक्षाच्या ऐतिहासिक विजयानंतर त्यांनी २२ मे २००४ आणि दुस-या कार्यकाळात पुन्हा २२ मे २००९ रोजी पंतप्रधानपद स्वीकारले. ते शीख समाजाचे पहिले पंतप्रधान होते. त्यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीत देशाचा विकासदर सर्वाधिक सात ते आठ टक्के राहिला. त्यांच्याच काळात अमेरिकेबरोबर अणुकरार झाला. मात्र विशेषत: दुस-या कार्यकाळात अनेक घोटाळ्यांचे खापरही त्यांच्यावर फोडण्यात आले. ते पंतप्रधान असताना सोनिया गांधी यांच्या हातात रिमोट कंट्रोल राहिल्याचा आरोपही त्यांच्यावर झाला. त्यांच्या जीवनावर ‘अ‍ॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ नावाचा चित्रपटही निघाला होता. पं. जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यानंतर सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषविणारे ते तिसरे पंतप्रधान ठरले. आपल्या पंतप्रधानपदाच्या काळात राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मोहीम, आधार कार्ड, माहिती अधिकार कायदा आदी अनेक योजना त्यांनी सुरू केल्या. कोणीही भूकबळी ठरू नये यासाठी अन्नसुरक्षा कायदा, भूसंपादन कायदा, वनअधिकार कायदा, १०० दिवसांचा रोजगार देण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा), इंदिरा गांधी मातृत्व योजना यासारखे ऐतिहासिक निर्णय त्यांच्याच कार्यकाळात झाले.

तरीही आजचे पंतप्रधान नरेंद्र मोदी वारंवार विचारतात, काँग्रेस सरकारने काय केले? माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना आदरांजली वाहताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी डॉ. सिंग यांनी शांतपणे जे करून दाखवले ते अनेकांना बोलून पण करून दाखवता आलेले नाही, अशी बोलकी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. डॉ. सिंग यांचा जन्म २६ सप्टेंबर १९३२ रोजी गाह (सध्या पाकिस्तान) पश्चिम पंजाबमध्ये झाला. १९४७ साली ते फाळणीनंतर कुटुंबियांसह भारतात आले. ऑक्सफर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्रात डॉक्टरेट मिळवल्यानंतर १९६६-६९ या काळात ते संयुक्त राष्ट्रात दाखल झाले. त्यानंतर ललित नारायण मिश्रा यांनी व्यापार व उद्योग खात्याचे सचिव म्हणून डॉ. सिंग यांची नियुक्ती केली. १९७० ते ८० दरम्यान त्यांनी भारत सरकारच्या विविध खात्यांत महत्त्वाच्या पदांवर काम केले. १९७२ ते ७६ मुख्य आर्थिक सल्लागार, १९८२ ते ८५ आरबीआयचे गव्हर्नर, १९८५ ते ८७ नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष आदी पदांवर त्यांनी काम केले.

डॉ. सिंग वागण्यात अतिशय नम्र होते. प्रत्येकाशी ते आदराने बोलायचे. बोलताना त्यांचा आवाज वाढल्याचे अथवा एखाद्याचा अपमान झाल्याचे एकही उदाहरण सापडणार नाही. स्वच्छ चारित्र्याचे आणि कधीही कसलाही आरोप न झालेले पंतप्रधान म्हणून त्यांचा उल्लेख केला जाईल. डॉ. सिंग यांच्या कार्यकाळात काही वेळा भारतीय सैन्याने शत्रूच्या भूमीत जाऊन कारवाया केल्या पण त्याची त्यांनी कधी जाहिरात केली नाही. विनाशाच्या कड्यावर जाऊन पोहोचलेली भारताची अर्थव्यवस्था अतिशय भक्कम करण्याचे श्रेय डॉ. सिंग यांना द्यावे लागेल. देशात असंख्य घोटाळे झाले तरीसुद्धा आपली अर्थव्यवस्था जगाला पुरून उरली. डॉ. सिंग यांचे जाणे मनाला चटका लावणारे आहे. सामान्य माणसासाठी विकासाचे दरवाजे उघडणा-या डॉ. मनमोहन सिंग यांना भावपूर्ण आदरांजली!

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR