जेएनपीटी येथील ३८ कंटेनर चालकही आजपासून संपावर
मुंबई : प्रतिनिधी
उद्या मध्यरात्रीपासून अवजड वाहने, खासगी बस, शाळेच्या स्कूल बस चालक, मालकांचा बेमुदत संप सुरू होणार आहे. यात मुंबईच्या ३० हजार शाळेच्या बसेसचा समावेश आहे. जेएनपीटी येथील ३८ हजार कंटेनर वाहतूक चालकही संपात सहभागी होणार आहेत. तसेच इतर खासगी बस चालक, मालक यांचाही संपात सहभाग असणार आहे.
एलपीजी वाहक, अत्यावश्यक सेवा देणारे ट्रॅक, पाणी वाहक टँकर अशा सर्वच अवजड वाहतूक करणा-या चालक आणि मालक यांचा मंगळवारी मध्यरात्रीपासून बेमुदत संप होणार आहे. ई-चलन कारवाई थांबवावी, आधी केलेल्या कारवाईचे दंड माफ करावा, क्लिनर अनिवार्य असल्याचा निर्णय मागे घ्यावा, अशा मागण्यांसाठी सर्व अवजड वाहतूक करणा-या संघटनांचा संप होणार आहे.
भारताची सर्वात मोठी वाहतूक संस्था ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट काँग्रेस नवी दिल्ली, बस अँड कार कॉन्फिडरेशन नवी दिल्ली, महाराष्ट्र, महाराष्ट्र राज्य ट्रक टेम्पो टँकर बस वाहतूक महासंघ, स्कूलबस संघटना महाराष्ट्र राज्य, इंटरस्टेट कंटेनर असोसिएशन महाराष्ट्र, एलपीजी वाहतूक संघटना महाराष्ट्र राज्य, अशा जवळपास सगळ््याच संघटनांचा पाठिंबा आहे. या संपाचा सर्वात मोठा फटका वारकरी, शाळकरी मुलांना बसण्याची शक्यता आहे. यासंदर्भात मंत्रालयात काही दिवस आधी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती. मात्र, त्यात तोडगा निघाला नाही, अखेर चक्काजाम आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला आहे.