ताडकळस : प्रतिनीधी
पुर्णा तालुक्यातील ताडकळस पोलिस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या गावांत शासनाकडून निर्बंध करण्यात आलेल्या अवैध रेतीची वाहतूक करणा-या वाहनांवर ताडकळस पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ताडकळस पोलीसांकडून ताडकळस व परिसरात अवैध रेती वाहतूक करणा-या वाहनांवर कारवाई करुन गुन्हा दाखल करण्यात येत आहेत.
दरम्यान, रविवार दिनांक २० एप्रिल रोजी मध्यरात्री २३:५० च्या सुमारास ताडकळस कडून परभणीकडे अवैध रेती वाहतूक करणा-या टिप्पर वर कार्यवाही करण्यात आली. या कार्यवाहीत ५ लाख १६ हजार रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, धार रोड परभणी ता.जि. परभणी येथील आरोपी गुलाब नामदेवराव पारखे वय वर्ष ३६ हे रविवार दिनांक २० एप्रिल रोजी मध्यरात्री ११.५० च्या सुमारास ताडकळस ते परभणी रोडवर तामकळस पाटीजवळ अवैध रेती वाहतूक करताना आढळून आले असता ताडकळस पोलीसांकडून अवैध रेती सह टिप्पर पकडण्यात आले .
या कार्यवाहीत अंदाजे ५ लाख रूपये किंमतीचा एक टाटा कंपनीचा एम.एच. २७ बी.एक्स. – ५८४७ क्रमांकाचा टिप्पर व अंदाजे ८ हजार रूपयांची दोन ब्रास रेती असा एकुण ५ लाख २६ हजार रूपयांचा मुद्देमाल ताडकळस पोलीसांकडून जप्त करण्यात आला .
या प्रकरणी ताडकळस पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक गणेश लोंढे यांच्या फिर्यादीवरून ताडकळस पोलिस ठाण्यात आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत पुढील तपास सपोनी गजानन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार रामकिसन काळे हे करीत आहेत .