अहमदपूर : प्रतिनिधी
शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली अहमदपूर शहर व तालुक्यातील लोकांना उद्ध्वस्त करणारे अवैध धंदे बंद करण्याच्या मागणीसाठी येथील उपविभागीय पोलिस अधिकारी व तहसीलदार यांना निवेदन देऊन तात्काळ अवैध धंदे बंद करावेत अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली तालुका शिवसेनेच्या वतीने येथील उपविभागीय पोलिस अधिकारी अरविंद रायबोले व तहसीलदार उज्वला पांगरकर यांना निवेदन देण्यात आले असून अहमदपूर शहर हे महाराष्ट्रात शैक्षणिक पंढरी म्हणून ओळखले जाते. या शहरात शाळा, महाविद्यालयांसमोर चक्क दिवसा ढवळ्या खूलेआम अनेक दिवसांपासून दारू विक्री केली जाते.
तसेच पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ, तहसील कार्यालयाच्या समोर तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेच्यासमोर, महात्मा फुले शाळेला जाणा-या रोडवर, थोडगा रोड, निजवंतेनगर आदी ठिकाणी खुलेआम वेळी-अवेळी पोलिसांच्या नाकावर टिच्चून दारूविक्री केली जाते. बस स्थानकाच्या अगदी समोर रोडवर आणि लोहा जाणा-या अवैध प्रवासी वाहतूक करणा-या गाड्या महात्मा फुले रोडवर उभ्या केल्या जातात. याचा नाहक त्रास विद्यार्थी व विद्यार्थिनींना, महिलांना होत आहे. त्याबरोबरच किनगाव जाणा-या गाड्या तहसीलच्या कोप-यावर उभा केल्या जात असल्यामुळे वाटसरूंना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शहरात विद्यार्थिनींच्या छेडछाड करण्याचे प्रमाणही वाढले आहे. तसेच शहरात चोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे, सोमवारी आठवडी बाजारात चो-यांचे प्रमाण वाढले आहे. याकडे पोलिसांचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात या मुख्य ठिकाणी अवैध दारूविक्री केली जाते. तसेच तालुक्यातील शिरूर ताजबंद, हडोळती, किनगाव यासह अनेक गावात वाडी- तांड्यावर मटका, आणि गुटखा प्रत्येक पान टपरीवर खुलेआम विकला जातो. अवैध दारू विक्री केली जाते, अंबेजोगाई जाणा-या सिमेंट रोडवर चक्क रेतीचे साठे साठवले जात आहेत. याकडेही पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. या प्रकाराविरुध्द तात्काळ पाऊल उचलून आठ दिवसांत शहरातील अवैध धंदे बंद करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनाव्दारे देण्यात आला आहे. अहमदपूर शहरात खुलेआम पत्त्याचे, जुगाराचे क्लब सुरू आहेत. यामुळे गोरगरीब व कर्मचा-यांचे लाखो रुपये जुगारात जात आहेत. गोरगरिबांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत.अनेकांच्या घरी पती-पत्नीची भांडणे होऊन संसार मोडत आहेत. त्यामुळे पोलिसांनी ताबडतोब हे सर्व चालणारे अवैध धंदे त्वरित बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनावर शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, उपजिल्हाप्रमुख भारत सांगवीकर, शिवसेना जिल्हा कार्यालय प्रमुख सुभाष गुंडिले, तालुकाप्रमुख दत्ता हेंगणे, तालुका संघटक अनिकेत फुलारी, तालुका उपप्रमुख गणेश माने, संतोष आदटराव, लहू बारवाड, पद्माकर पेंढारकर, शहर प्रमुख शिवा कासले, किसान सेना तालुका प्रमुख सुधाकर जायभाये, उपशहर प्रमुख शिवा भारती, उपशहर प्रमुख शिवकुमार बेद्रे, गजानन येन्ने, कालिदास धुळगुंडे, दामोदर घोरपडे, विठ्ठल भोगे, नितीन मस्के, शेख महेताब, संतोष गायकवाड, गौसोद्दीन शेख, शरद पेंडलवाड, अल्ताफ पठाण, सुनील कदम, ज्ञानेश्वर मस्के, हासन सय्यद, प्रकाश लांडगे, माधव थगनर यांच्या स्वाक्ष-या आहेत.