मैदानाबाहेरून
रांची कसोटीतील दुस-या दिवसाखेर टीम इंडियाची परिस्थिती नाजूक झाली असून अॅडव्हांटेज इंग्लंड अशी टेनिसमधील फ्रेज वापरता येईल अशी परिस्थिती आहे. सकाळी पाहुण्यांनी सात बाद ३०२ वरून सुरुवात केली. कालच्या नाबाद असलेल्या ओली रॉबिन्सनने फटकेबाजी करत ३४७ पर्यंत डाव वाढवला. त्यानंतर जडेजाने ३ विकेट्स घेत पाहुण्यांचा डाव ३५३ वर संपुष्टात आणला. टीम इंडियाच्या आज दिवसाखेर सात बाद २१९ धावा झाल्या असून यजमान पहिल्या डावात १३४ धावांनी पिछाडीवर आहेत.
तिस-या दिवशी धावांची पिछाडी कमी करण्याची जबाबदारी ध्रुव झुरेल (३०)आणि कुलदीप यादव (१७) या नाबाद खेळाडूंवर आहे. सलामीवीर जयस्वालने संयमी फलंदाजी करत भारताचा डाव सावरला. रोहित शर्मा, पाटीदार व अश्विन पंचांचे बळी ठरले. कारण पंचांनी मैदानावर या तिघांना पायचीत दिले होते. यूडीआरएसमध्ये बॉल ट्रेकिंगच्या वेळेस चेंडू लेफ्ट यष्टीला स्पर्श करून जात होता त्यामुळे तिस-या अम्पायरने मैदानावरील पंचांचा निर्णय उचलून धरला.
गेल्या कसोटीत इंग्लिश फलंदाज अशा प्रकारे बाद झाल्यावर पाहुण्या कर्णधाराने तक्रार नोंदवली होती पण आज असे केल्याचे अजिबात दिसले नाही. भारतातर्फे एकही शतकी भागीदारी होऊ शकली नाही. गिल व जयस्वाल यांनीच ८२ धावांची भागीदारी केली. शोएब बशिरने चार भारतीयांना तंबूत पाठवले. जडेजाने २ षटकार खेचले पण तो जास्त काळ टिकू शकला नाही.
सरफराज खान (१४), रजत पाटीदार(१७), शुभमन गिल (३८) यांच्यामुळे डावाला आकार आला. तरी धावांची पिछाडी कमी करण्याची जबाबदारी यष्टीरक्षक ध्रुव झुरेल व कुलदीप यादव या नाबाद फलंदाजांवर आहे. तिस-या दिवशी भारतीय संघाने आघाडी घेतली नाही तर इंडियाला धोकादायक ठरेल कारण चौथ्या डावात भारताला फलंदाजी करायची आहे.
( डॉ. राजेंद्र भस्मे)