मुंबई : प्रतिनिधी
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला कोणाची रसद आहे? याची माहिती नेतृत्वाकडे आहे. योग्यवेळी आमचे नेतृत्व त्याचा खुलासा करू, असा आरोप गृहराज्य मंत्री पंकज भोयर यांनी मराठा आंदोलना विषय केला आहे.
दरम्यान, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या बेमुदत उपोषणाला लाखो मराठा आंदोलकांनी प्रतिसाद दिला आहे. लाखोंच्या संख्येने मुंबईत अनेक आंदोलक पोहोचले आहेत. अशामध्ये दुसरीकडे गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी केलेल्या विधानाची चांगलीच चर्चा होत आहे. सोमवार (१ सप्टेंबर) हा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा चौथा दिवस ठरला आहे.
भोयर म्हणाले, मराठा आंदोलनामुळे सीएसटीसह दक्षिण मुंबई भागात वाहतूक कोंडी होणार नाही, याची काळजी मुंबई पोलीसांकडून घेतली जात आहे. हुल्लडबाज आंदोलकांवर पोलिसांची नजर राहणार आहे, असेही यावेळी ते म्हणाले आहेत. आपल्या आंदोलनामुळे सामान्य मुंबईकरांना त्रास होणार नाही, कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची खबरदारी मराठा आंदोलकांनी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे.