पूर्व गोदावरी : आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यात आज मोठी दुर्घटना घडली असून, एक ‘मिनी ट्रक’ पलटी झाल्याने ७ जणांचा मृत्यू झाला आहे. पूर्व गोदावरी जिल्ह्यातील देवरापल्ली मंडळातील चिन्नईगुडेमधील चिलाका पाकला भागात हा अपघात झाला. ट्रकचालक खड्डे टाळण्याचा प्रयत्न करत असताना अचानक त्याचे ट्रकवरचे नियंत्रण सुटले आणि ट्रक रस्ता सोडून थेट कालव्यात उलटला आणि ट्रकवर बसलेल्या सर्व ७ जणांचा जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, काजूने भरलेला मिनी ट्रक टी नरसापूरम मंडलातील बोरामपलेम येथून निदादावोलू मंडलातील ताडीमल्लाकडे जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रक उलटला. यानंतर स्थानिक लोक आणि पोलिसांनी काजूनी भरलेल्या पोत्याखाली दबलेले मृतदेह बाहेर काढले आणि पोस्टमॉर्टेमसाठी कोव्वूर रुग्णालयात नेण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातानंतर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सुरू आहे.
या घटनेबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना पूर्व गोदावरी जिल्हा पोलिस अधीक्षक नरसिंह किशोर यांनी सांगितले की, या दुर्घटनेमध्ये सात जणांचा मृत्यू झाला, तर एक जण वाचला आहे. या अपघातावर राज्याचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले असून, सरकार पीडित कुटुंबांच्या पाठीशी उभे राहून आवश्यक ती मदत करेल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.