शिमला : हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला येथे संजौली मशिदीवरून निर्माण झालेला वाद थांबण्याचे नाव घेत नाहीय. या दरम्यान हिंदू संघटनांनी आज विरोध प्रदर्शन सुरू केले आहे आणि मोठ्या संख्येने जमलेल्या आंदोलकांनी पोलिसांनी लावलेली बॅरिकेडिंग तोडले यावेळी आंदोलकांना नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. यासोबतच वॉटर कॅनचा देखील वापर करण्यात आला. आंदोलक बॅरिकेडिंग तोडून मशिदीच्या दिशेने जात होते. मात्र पोलिसांनी त्यांना नियंत्रित करत पळवून लावले. दरम्यान, काही अंतरावर त्यांचे विरोध प्रदर्शन सुरू आहे. तर दुसरीकडे पोलिसांनी अनुचित प्रकार घडू नये यासाठी कलम १६३ लागू केले आहे.
संजौली येथील मशिदीच्या बेकायदा बांधकामाविरोधात हिंदू संघटना आक्रमक झाल्या असून, बेकायदा बांधकामाविरोधात हे प्रदर्शन करण्यात येत आहे. यावर हिमाचल प्रदेशचे मंत्री विक्रमादित्य सिंह म्हणाले की, सर्वांना शांततामय मार्गाने विरोध करण्याचा अधिकार आहे. शांतता भंग होईल, अशी स्थिती निर्माण होऊ नये म्हणून खबरदारीच्या हेतूने पोलिसांनी काही पावले उचलली असून, कलम १६३ लागू करण्यात आले आहे, असे मंत्री विक्रमादित्य सिंह म्हणाले. दरम्यान, हे प्रकरण न्यायालयात विचाराधीन आहे. सुनावणीनंतर सरकार बेकायदा बांधकामाविरोधात निर्णय घेईल. ही मशिद बेकायदा असेल तर निश्चित कारवाई केली जाईल. त्याआधी कारवाई करणे योग्य नाही, असेही मंत्री विक्रमादित्य सिंह म्हणाले.
कलम १६३ लागू
दरम्यान, आंदोलनापूर्वी संजौली येथील मशिदीच्या बेकायदा बांधकामाविरोधात आज होणारे आंदोलन स्थगित करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि हिंदू संघटना यांच्यात झालेली चर्चा निष्फळ ठरली आहे. यानंतर कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नवबहार चौक ते ढाली बोगदा, आयजीएमसी ते संजौली चौक, संजौली चौक ते चलोंठी आणि ढाली मार्गे संजौली-चाळोंठी जंक्शन परिसरात आज सकाळी ७ ते रात्री ११.५९ वाजेपर्यंत कलम १६३ लागू करण्यात आले. तर हिंदू संघटना आंदोलनावर ठाम आहेत. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले आहे.