माझे दादा मला पोरका करून गेले…
माझे वडील गेल्यानंतर दादांनी मला वडील नसल्याचे कधी जाणवू दिले नाही. माझं आणि दादांचं नातं शब्दात सांगू शकत नाही. संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासाचे स्वप्न उराशी घेऊन झोपणार आणि भल्या पहाटे ती स्वप्नं पूर्ण करण्यासाठी कामाला लागणारा नेता; वेळेचे नियोजन, शिस्त यातून विकासाचा दरारा महाराष्ट्रात उभा करणारे दादा आज महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला स्तब्ध करून आणि आम्हा सर्वांना दु:खाच्या छायेत सोडून निघून गेले… दादांचे अकाली निधन ही घटनाच मुळात हृदयाला न पटणारी आहे. आमचे राजकीय अस्तित्व दादांच्या जीवावर होते… त्यामुळे अजूनही असं वाटतंय की आत्ता दादांचा फोन येईल आणि म्हणतील, धनंजय वेळेवर ये बरका त्यामुळे श्रद्धांजली हा शब्दच फुटत नाहीये.. देशाची, राज्याची, पक्षाची, माझ्या बीड जिल्ह्याची आणि माझी कधीही न भरून निघणारी हानी आहे. अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी अजित पवारांच्या निधनावर दिली आहे.
अजितदादा आणि धनंजय मुंडे यांचे नाते अत्यंत जिव्हाळ्याचे आणि वेगळे होते. पक्षातील तुमचा सर्वात लाडका कार्यकर्ता कोण? असा प्रश्न विचारला असता, दादा नेहमी जाहीरपणे धनंजय मुंडे यांचेच नाव घेत असत. दादांच्या या अकाली एक्झिटमुळे धनंजय मुंडे यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला असून एक खंबीर राजकीय आणि वैयक्तिक आधार हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

