मुंबई : प्रतिनिधी
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा पुढचा टप्पा लवकरच सुरू होणार असून, मनोज जरांगे पाटील यांचे पुढचे उपोषण आता मुंबईतील आझाद मैदानात होणार आहे. या निमित्ताने मराठा समाजाचे शिष्टमंडळ मुंबईत दाखल झाले असून, १५ ते २० गाड्यांच्या ताफ्यासह जरांगे पाटील यांचे शिष्टमंडळ आझाद मैदानावर दाखल झालेत. या पाहणीनंतर आझाद मैदानावरील स्थितीचा सर्व आढावा आणि सध्याची परिस्थिती मनोज जरांगे पाटील यांना सांगण्यात येणार असल्याची माहिती इथे आलेल्या शिष्टमंडळानं दिली.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासह अन्य विविध मागण्यांसाठी मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झालेला पाहायला मिळत असून, ऐन गणपतीच्या दिवसात म्हणजे २९ ऑगस्ट रोजी मराठा समाजाचा मोर्चा मुंबईच्या दिशेने येणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व स्वत: मनोज जरांगे पाटील करणार असून, जरांगे पाटील २९ ऑगस्ट रोजी मुंबईत येणार असल्याची माहिती आझाद मैदानाची पाहणी करण्यासाठी आलेल्या शिष्टमंडळाने दिली आहे.
या उपोषणात मोठ्या संख्येने मराठा समाज सामील होणार असून, त्या निमित्ताने आम्ही मुंबईत विविध मैदानाची पाहणी करीत आहोत. यात आझाद मैदान, वांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील मैदान आणि दादर येथील शिवाजी पार्क अशा तीन मैदानांची आम्ही पाहणी करणार आहोत. या पाहणीनंतर आम्ही घेतलेली सर्व माहिती आम्ही जरांगे पाटील यांना सांगू. त्यानंतर उपोषणाच्या नियोजनाबाबत स्वत: जरांगे पाटील घोषणा करतील. अशी माहिती मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने दिली आहे.